कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांच्या परिसरात ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई केल्याने या ठिकाणचे पदपथ मोकळे झाले आहेत.
डोंबिवली पश्चिमेत तीन वर्षांपासून रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याची कार्यवाही महापालिकेच्या पथकाने पूर्ण केली आहे. पश्चिमेप्रमाणे पूर्व भागातील फेरीवाल्यांविरोधात मात्र कधी कारवाई होणार असा सर्वसामान्यांचा सवाल आहे. मागील आठवडय़ापासून कामत मेडिकल, पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक, राजाजी रस्ता परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. रस्ते, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेत फेरीवाल्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने त्यांनी जागोजागी आपले तळ ठोकलेले आहेत. त्यांच्यावर डोंबिवलीप्रमाणे कारवाई केली जावी, अशी मागणी होत आहे. डोंबिवली तसेच कल्याण रेल्वे स्थानकांवरील स्कायवॉकवर बसलेल्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.