गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे मनसे कार्यकर्ते दहन करीत असताना बघ्याची भूमिका घेतल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख व सहायक निरीक्षक कुमार घाडगे यांची मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाईचे कथित आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाती िशदे यांनी कार्यकर्त्यांसह गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुतळय़ाचे दहन केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
तथापि सदरचे आंदोलन सुरू असताना निरीक्षक देशमुख व सहा. निरीक्षक घाडगे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना अटकाव करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. याची गंभीर दखल घेत अधीक्षक दिलीप सावंत यांनी दोघांची मुख्यालयाकडे बदली केली आहे. शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार आर. डी. मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
टोलविरोधी आंदोलन सांगलीकरांनी अत्यंत संयमाने केले असून कोणताही वाद अथवा अशांतता निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. असे असूनसुद्धा अन्य राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ांचे दहन करणे हा राजकीय डावपेच असताना पोलीस अधिका-यांवर कारवाई होणे निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, भाजपच्या नीता केळकर आदींनी व्यक्त केल्या आहेत.