* १ जुलैपासून कारवाई
* मोहीम एक ते दोन महिने सुरू
सोळा वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या भंगार आणि परवाना नसलेल्या रिक्षा चालकांवर १ जुलैपासून कारवाई करण्याचा निर्णय कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. डोंबिवलीत सोळा वर्षांहून अधिक वापरात असलेल्या रिक्षांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे डोंबिवलीतून कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक गुजराथी यांनी सांगितले.
प्रवाशांना दर्जेदार प्रवासी सुविधा मिळावी. अनेक रिक्षा चालकांच्या रिक्षा भंगार झाल्यामुळे त्या रस्त्यात बंद पडतात. अनेक रिक्षाचालक केरोसीनचा वापर रिक्षामध्ये करीत असल्याचे आढळून आले आहे.
या रिक्षा वातावरण प्रदूषित करतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड परिसरात १६ वर्षांहून अधिक काळ वापरात असलेल्या रिक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे.
रिक्षा वापरून अधिक काळ झालेल्या रिक्षा चालकांनी आपल्या जुन्या रिक्षा भंगारात काढून जुन्या रिक्षेचे परमिट नवीन रिक्षेवर चढवून घ्यावे हाही या कारवाई मागील उद्देश आहे, असे आरटीओ गुजराथी यांनी स्पष्ट केले.
या तपासणीच्या वेळी ज्या रिक्षा चालकांकडे परमिट नसतील त्या रिक्षा चालक, मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम एक ते दोन महिने सुरू ठेवण्यात येणार आहे. जे रिक्षा चालक, मालक आपली भंगार रिक्षा चोरून लपून वापरण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे गुजराथी यांनी सांगितले.
डोंबिवली विभागात राजकीय नेते, त्यांचे कार्यकर्ते, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांच्या सर्वाधिक रिक्षा असल्याचे वाहतूक व आरटीओ विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कारवाईच्या वेळी होणाऱ्या अडथळ्यांवर मात करून ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे आरटीओ कार्यालयातील सूत्राने सांगितले.
जे रिक्षा चालक कारवाईच्या वेळी राजकीय दबाव तंत्राचा वापर करतील त्यांचा कोणताही मुलाहिजा ठेवण्यात येणार नाही.