कृषी उत्पन्न बाजार समितीतील अतिक्रमणांवर रविवारी हातोडा घालण्यात आला. तेथील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात बाजार समितीच्या प्रशासनाने हटविले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते व गूळ व्यापाऱ्यांचे अतिक्रमण हा गेली अनेक दिवस चर्चेचा विषय होता. बाजार समिती प्रशासकपदाची सूत्रे घेतलेल्या डॉ. महेश कदम यांनी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जागेची, रस्त्याची मोजणीही करण्यात आली होती. अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी पिवळे पट्टे मारून ती जागा निश्चित करण्यात आली होती. अतिक्रमण काढण्याबाबत गेल्या आठवडय़ामध्ये संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. अतिक्रमण काढण्यासाठी २७ डिसेंबर ही अखेरची मुदत दिली होती. तथापि, व्यापाऱ्यांनी आपली बाजू रास्त असल्याचे सांगत अतिक्रमण न काढण्याची भूमिका घेतली होती.    
आज अतिक्रमणे उभीच असल्याचे दिसून आल्यावर ती काढण्याची यंत्रणा सतर्क झाली. या परिसरातील भाजीपाला विभागातील अतिक्रमण जेसीबी यंत्रणेच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. या वेळी बाजार समितीचे पदाधिकारी आणि दुकानदार मोठय़ा संख्येने उपस्थित होते. एकूण २२० व्यावसायिकांना अतिक्रमणांबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने या सर्वाचे अतिक्रमण काढले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव संपत पाटील यांनी दिली. अतिक्रमण असलेल्या व्यापाऱ्यांनी काल प्रशासक डॉ. कदम यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी ती भेट नाकारली होती. त्यावर व्यापाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले असता याप्रश्नी मंगळवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते असे असताना आज व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणावर बाजार समितीच्या प्रशासनाने हातोडा घातला. यामुळे व्यापाऱ्यांच्यात नाराजी पसरली आहे. तर बाजार समितीने मात्र अतिक्रमणांचे निर्मूलन झाल्याने शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान होणार नसल्याचे म्हटले आहे.