मुंबईत अस्वच्छता करणाऱ्यांना दंड केल्यानंतर निम्मी रक्कम पदरात पडत असल्यामुळे क्लिन अप मार्शलचा वारू सुसाट सुटला असून अशाच दोन क्लिन अप मार्शलवरच कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. त्यामुळे ‘क्लिन अप मार्शल’ योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ओशिवरा येथे कचरा करणाऱ्या एका नागरिकाविरुद्ध दोन क्लिन अप मार्शलनी कारवाईचा बडगा उगारला. सदर नागरिक आणि क्लिन अप मार्शलमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दंड भरण्यास असमर्थता दर्शवताच क्लिन अप मार्शलने संबंधित नागरिकाची गळ्यातील सोनसाखळी आणि बोटातील अंगठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस हे प्रकरण ओशिवरा पोलीस ठाण्यात गेले. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर पोलिसांनी क्लिन अप मार्शलवरच दंडात्मक कारवाई केली. अशा घटनांमुळे ही योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
क्लिन अप मार्शल नागरिकांना विनाकारण त्रास देऊन पैसे उकळत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुदत संपताच ही योजना बासनात गुंडाळण्यात आली होती. मात्र अस्ताव्यस्त कचरा फेकणाऱ्यांना, पान खाऊन थुंकणाऱ्यांना क्लिन अप मार्शलची जरब बसली होती. त्यामुळे काही अंशी ‘स्वच्छ मुंबई’चे स्वप्न साकारू लागले होते. त्यामुळे ही योजना पालिकेने पुन्हा सुरू केली. या योजनेतील कंत्राटदारांच्या योग्यता पडताळणीची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली होती. ए वॉर्डसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्यामुळे क्लिन अप मार्शल योजनेतून त्याचे नाव कापण्यात आले. उर्वरित २४ कंत्राटदारांना कंत्राटे देण्यात आली आणि ही योजना पुन्हा सुरू झाली. बांधकामे सुरू असलेली ठिकाणे, डॉक्टर आदींकडे जाऊ नये, सहाय्यक आयुक्तांनी नियुक्ती केलेल्या ठिकाणीच कारवाई करावी, असे आदेश त्यांना देण्यात आले. कोणत्याही विभागात कारवाईचा बडगा उगारण्यापूर्वी १५ दिवस तेथे प्रबोधन करावे, अशी सक्त ताकीद क्लिन अप मार्शलना करण्यात आली आहे. मात्र कचरा करणाऱ्याकडून वसूल केलेल्या दंडातील निम्मी रक्कम पदरात पडत असल्यामुळे क्लिन अप मार्शलनी नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.