मतदारयादीत छायाचित्रे नसलेल्या मतदारांचे फोटो संकलन करण्याच्या कामात कसूर केल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यावर बीएलओ पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा इशारा उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी दिला. मतदारांचे फोटो संकलन करण्यासह मतदारयादी अद्ययावत करण्याच्या विषयावर तहसील कार्यालयात तालुक्यातील कर्मचाऱ्यांची बैठक झाली. तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार व्ही. एस. जोगदंड आदी उपस्थित होते. विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मतदारांची छायाचित्रे संकलित केली जात आहेत. आयोगाने प्रत्येक केंद्रांतर्गत किती मतदारांची छायाचित्रे नाहीत, याची स्वतंत्र यादी मतदान केंद्राला दिली. त्यानुसार संबंधित बीएलओ कर्मचाऱ्यांनी संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून छायाचित्र घेणे बंधनकारक आहे. मतदार फोटो देत नाहीत, अशी तक्रार न करता त्यांच्याशी संपर्क साधा व छायाचित्र न दिल्यास संबंधित मतदारांचे नाव मतदारयादीतून वगळण्यात येईल, याची जाणीव करून द्यावी. मतदारांकडे छायाचित्र नसेल तर स्वत:च्या मोबाइलवर त्याचे छायाचित्र घ्यावे, अशा सूचनाही या वेळी देण्यात आल्या. दरम्यान, एका कर्मचाऱ्याने या छायाचित्राचे पैसे कोण देणार? असा सवाल बैठकीत करताच थोरात यांनी त्याला चांगलाच दम भरला.