एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा किंवा टॅक्सी पकडण्यास एखाद्या चौकात उभे राहिल्यावर येणारा प्रत्येक रिक्षा-टॅक्सीचालक भाडे नाकारतो, हा अनुभव मुंबईकरांना काही नवीन नाही. या अनुभवातून वेळप्रसंगी रिक्षा-टॅक्सीचालकांबरोबर प्रवाशांचे भांडणही होते. मात्र आता अशा मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने ठरवले आहे. अरेरावी करीत भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांविरोधात परिवहन विभागाने एक आठवडाभर विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी १२ चालकांवर कारवाई करण्यात आली.
फेब्रुवारी आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये ‘बेस्ट’ची भाडेवाढ झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा रिक्षा-टॅक्सीकडे वळवला आहे. मात्र रिक्षा-टॅक्सीचालकांची अरेरावी, जवळचे भाडे नाकारण्याची पद्धत यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अनेकदा जवळचे भाडे असल्याने रिक्षा-टॅक्सीचालक ते सर्रास नाकारतात. या कारणामुळे अनेकदा रिक्षा-टॅक्सीचालक व प्रवासी यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. वाहतूक पोलिसांनी वास्तविक या प्रकरणी हस्तक्षेप करणे गरजेचे असते. मात्र प्रत्येक वेळी वाहतूक पोलीस हस्तक्षेप करतील, अशी परिस्थितीही नसते. त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी वाढल्याच्या तक्रारी प्रवाशांनी नोंदवल्या होत्या.
गेल्या काही महिन्यांत या तक्रारी नोंदवण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल करावा, असे आदेश मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने गेल्याच महिन्यात दिले आहेत. या नव्या नियमानुसार मोटार वाहन कायदा [कलम २२(डी) १७८(३) बी] या अंतर्गत हा हजार रुपयांचा दंड वसूल करण्याची तरतूद केली आहे.
या नव्या नियमाला धरून आता मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने ही कारवाई सुरू केली आहे. ही विशेष कारवाई मोहीम सोमवारपासून एक आठवडा चालणार आहे. सध्या चालू असलेल्या या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी भाडे नाकारणाऱ्या आणि प्रवाशांशी अरेरावी करणाऱ्या १२ रिक्षा-टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढेही भाडे नाकारणाऱ्या किंवा अरेरावी करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरोधात प्रवाशांनी टोल फ्री क्रमांक १८००-२२-०११० यावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहनही परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.