जिल्ह्य़ातील संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्याबाबत टंचाईग्रस्त भागाचे आराखडे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच टँकर सुरू करण्याबाबत केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या जाणार आहेत. दरम्यान, टंचाईच्या कामात कसूर केल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी पत्रकारांना दिली.
चालू वर्षांत जिल्ह्य़ात पाऊस कमी झाल्याने धरणे, तलावातील पाणीसाठय़ात वाढ झाली नाही. पाणीपातळी अत्यंत खोल गेल्याने उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार, असेच चित्र आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा वीजदेयके थकल्याने बंद आहेत. पिण्याच्या पाणीप्रश्नावर मंगळवारी आखाडा बाळापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे २० दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा योजनांची अवस्था अतिवाईट आहे. अनेक योजना बंद असल्याने जिल्ह्य़ावर पाणीटंचाईचे मोठे संकट येणार, असे चित्र आहे. पाणीटंचाईच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांच्याशी स्थानिक पत्रकारांनी संपर्क साधला असता पत्रकारांना पाणीप्रश्नावर माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्य़ात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करणार असल्याने याची दखल प्रशासनाने घेतली आहे. संभाव्य पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन यंदा जादा टँकरने ग्रामीण भागात पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा मागविल्या. परंतु केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या.
 परिणामी पुन्हा नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत. तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या भागाचे आराखडे तयार करण्याच्या सूचना यंत्रणेस दिल्या आहेत. यात कोणत्या भागात किती विहिरी, बोअर, विहिरी अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव तयार करणे, बंद पाणीपुरवठा योजना सुरू करणे, पाणीपुरवठय़ाची अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले. जिल्ह्य़ात वादग्रस्त ठरलेले पाणीपुरवठय़ाचे कार्यकारी अभियंता आर. डी. वाहणे यांची गडचिरोली जिल्ह्य़ात बदली झाली आहे.