डॉक्टरांकडून ‘कट प्रॅक्टीस’ करण्याच्या प्रमाणात सर्वत्रच वाढ होत असून, तशा तक्रारी आल्यास त्याची दखल घेऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र वैद्यक परिषदेने दिला आहे. या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा डागाळत असल्याने डॉक्टरांनी त्यापासून दूर राहण्याचा सल्लाही परिषदेने दिला आहे. दरम्यान, परिषदेच्या या कारवाईच्या इशाऱ्यामुळे कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एखादा रुग्ण लक्षणे पाहून एखाद्या डॉक्टराकडे उपचारासाठी जातो. यावेळी त्याला नेमका कोणता आजार आहे, हे ओळखण्यासाठी विशिष्ट चाचण्या करावयास लावल्या जातात. त्यावरून रुग्णाला नेमका कोणता आजार आहे, हे स्पष्ट होते. समजा एखादा रुग्ण औषध तज्ज्ञांकडे उपचारासाठी गेला असता, त्याला हृदयाचा विकार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर  डॉक्टर संबंधित रुग्णाला एका विशिष्ट हृदयरोग तज्ज्ञांकडे पाठवतो. हा रुग्ण सांगितल्यनुसार हृदयरोग तज्ज्ञांकडे गेल्यास त्याला या रुग्णांकडून मिळणाऱ्या रकमेतून २० ते ३० टक्के रक्कम रुग्ण पाठवणाऱ्या डॉक्टरला देतो. यालाच ‘कट प्रॅक्टीस’ असे वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. नागपूर शहरातही याची लागण झाली असून ते प्रमाण फारच कमी असल्याचे सांगितले जात आहे.  
काही डॉक्टर तर कट प्रॅक्टीससाठी रुग्णांच्या मनात एखाद्या आजाराविषयी प्रचंड भीती निर्माण करून संबंधित डॉक्टरांकडे जाण्यास बाध्य करतात. त्यामुळे रुग्णही संभ्रमात पडून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरकडे जातात. तेथेही त्याला अमूक आजार असल्याचे सांगून त्याची लूट केली जाते. ही बाब रुग्णाच्या लक्षातच येत नाही. जेव्हा येते तेव्हा वेळ आणि हातचा पैसाही निघून गेलेला असतो. अशा काही तक्रारी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. असे प्रकार दोन चार डॉक्टर करतात. परंतु त्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचीच बदनामी होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी या अनैतिक प्रकारापासून दूर राहावे, असा सल्ला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी दिला आहे. यानंतरही संबंधित डॉक्टरांनी हा प्रकार सोडला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना शोधून काढणे हे कठीण काम असून ते सिद्ध करून दाखवणे हे त्याहून कठीण आहे. अशा डॉक्टरांविषयी तक्रारी आल्यास चौकशीसाठी समिती स्थापन करावी लागते. ही समिती सर्व बाबी पडताळून सत्यता तपासून बघते. त्यात कट प्रॅक्टीस केल्याचे सिद्ध झाल्यास ही समिती परिषदेला अहवाल पाठवते. त्या अहवालानुसार कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाते. परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्रात कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. याबाबतीत तक्रारी मात्र मोठय़ा संख्येने येऊ लागल्या आहेत. सध्या रुग्णही जागरुक झाला आहे. त्यालाही डॉक्टरांच्या संशयास्पद हालचाली टिपता येऊ लागल्या आहेत. तसेच उपचारासाठी लागणारी तजवीज म्हणून आरोग्य विमा उतरून घेत आहेत. ज्यांनी आरोग्य विमा काढून घेतला,
त्यांच्यावर कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांची विशेष नजर राहात असल्याचेही बोलले जाऊ लागले आहे. कारण आरोग्य विमामुळे रक्कम मिळण्याची अधिक शाश्वती असते. परंतु कोणता डॉक्टर ‘कट प्रॅक्टीस’ करतो, याची माहिती सामान्य रुग्णांना नसल्याने त्याचे आर्थिक नुकसान होत आहे.