राज्यातील अनेक धार्मिक स्थळे उभारणीत आमचे नेहमीच सहकार्य राहिलेले आहे. नागरिकांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा मी नितांत आदर करीत असल्याचे सर्वज्ञात आहे. मात्र मंदिरांच्या नावाखाली मंदिर सोडून करण्यात येत असलेली इतर अतिरिक्त बांधकामे, उपद्व्याप करणाऱ्या व्यक्तींच्या मनसुब्यांना माझा आक्षेप असून त्यावर वक्रदृष्टी असल्याचे स्पष्टीकरण राज्याचे कॅबिनेट मंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी महामुंबई वृत्तान्तशी बोलताना दिले आहे.
महामुंबईच्या शनिवार अंकात ‘इच्छापूर्ती गणेशावर पालकमंत्र्याची वक्रदृष्टी’ अशा मथळ्याखाली ऐरोली सेक्टर १५ मधील गणपती मंदिराच्या बाहेर होणाऱ्या अनधिकृत सभामंडपाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यावर नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यातील अनेक धार्मिक स्थळ उभारणीत नाईक कुटुंबीयांचा हातभार लागलेला आहे. त्यामुळे कोणत्याही धार्मिक स्थळाच्या विरोधात आपण यापूर्वी नव्हतो आणि यानंतरही राहणार नाही. मात्र मंदिरांच्या नावाखाली तेथील आजूबाजूच्या जागेचा गैरवापर काही अपप्रवृत्या व्यक्ती आपले मनसुबे तडीस नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले आहे.
 ऐरोली येथील सेक्टर १५ मधील गणपतीच्या बाबतीत हेच कृत्य केले जात होते. त्यामुळे त्याला रोखण्याची गरज आपल्याला वाटली. त्यासाठी पालिका आयुक्त व पोलीस आयुक्त यांना आमच्या कार्यकर्त्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत. अशी बांधकामे किंवा मंदिराच्या नावाने आपले उखळ पांढरे करून इतर उपद्व्याप करणाऱ्या व्यक्ती कोणीही असोत त्याला आपला विरोध राहणार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले.
‘इच्छापूर्ती गणेशावर पालकमंत्र्यांची वक्रदृष्टी’ या मथळ्यामुळे नागरिकांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज पसरण्याची शक्यता असल्याने आपण हे स्पष्टीकरण देत असल्याचे त्यांनी सांगितले. ऐरोली येथील या इच्छापूर्ती मंदिरासमोर पतऱ्याचा भक्कम शेड असताना तो तोडून त्या ठिकाणी बिनधास्तपणे सिमेंट क्राँक्रिटचा सभामंडप बनविण्याचे काम सुरू होते. विभागातील प्रभाग अधिकाऱ्याने अशी अनधिकृत बांधकामे सुरू असतानाच रोखणे आवश्यक असताना मंत्र्यांना त्यात लक्ष घालण्याची वेळ येत आहे.
शहरात अनधिकृत धार्मिक स्थळांचे प्रमाण वाढण्यास पालिका प्रशासन जबाबदार आहे. हे मंदिर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या पाठबळावर उभारले जात होते. त्यामुळे त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंदिराच्या मागील बाजूस सिमेंट क्राँक्रिटीकरण करून ती जागा वडापाव, इडली विक्रेत्यांना दिली गेली आहे. याच मंदिराच्या बाजूला दुसऱ्या एका मंदिर संचालकांनी खूप मोठय़ा प्रमाणात जागा हडप केलेली असून ऐरोलीतील एका सामाजिक संस्थेने त्याची यापूर्वीच तक्रार केलेली आहे, पण पालिका प्रशासन दखल घेत नसल्याचे दिसून येते.