ठाण्याच्या महापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पक्षादेश झुगारून तटस्थ राहण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अडीच वर्षांपूर्वी कोकण आयुक्तांकडे स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही आघाडी नामक गटात मनसेचे सात नगरसेवक सहभागी झाले होते. त्यामुळे या नगरसेवकांवर काँग्रेस आघाडीचा पक्षादेश लागू होतो. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मात्र मनसेने हा पक्षादेश झुगारला. त्यामुळे या नगरसेवकांचे पद रद्द करावे, अशी याचिका काँग्रेस आघाडीकडून कोकण आयुक्ताकडे दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा स्वरूपाची याचिका दाखल होऊ नये, यासाठी मनसेतील एका मांडवलीबहाद्दर नगरसेवकाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांची मनधरणी सुरू केल्याचे समजते. त्यामुळे यासंबंधी दोन्ही काँग्रेसचे नेते उघडपणे काही बोलण्यास तयार नव्हते.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीनंतर ठाणे महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा ६५ नगरसेवकांची लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली होती. कोकण आयुक्तांपुढे यासंबंधीच्या स्वाक्षऱ्या मनसेच्या नगरसेवकांनी केल्या. त्यामुळे या नव्या गटास मान्यता देण्यात आली. या आघाडीचा गटनेता म्हणून राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय भोईर यांची निवड करण्यात आली. ठाणे महापालिकेतील त्या वेळचे पक्षीय बलाबल लक्षात घेता मनसेचे नगरसेवक ‘किंगमेकर’च्या भूमिकेत होते, मात्र आघाडीत सामील होऊन मनसेने राष्ट्रवादीचे जोखड बांधून घेतले. ठाण्यातील मनसेच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या उपद्व्यापामुळे हे सर्व घडल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आघाडीतून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज पक्षाने कोकण आयुक्तांकडे केला. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मनसेने सर्वोच्च न्यायालयात या आघाडीला आव्हान दिले आहे. न्यायालयात यासंबंधीचा निर्णय जाहीर झाला नसल्याने अजूनही आघाडीचा पक्षादेश मनसेसाठी लागू असल्याची चर्चा आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी झालेल्या महापौर निवडणुकीत आघाडीला वाकुल्या दाखवत मनसेने पक्षादेश झुगारल्याने महापालिकेत नवा राजकीय पेच उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
रवींद्र फाटक यांच्या बंडखोरीमुळे या निवडणुकीत शिवसेना विजयाची औपचारिकता शिल्लक राहिली होती. त्यामुळे आघाडीला मतदान करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नसते बालंट नको, असा सूर मनसेत होता. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली, मात्र तटस्थ राहताच आघाडीचा पक्षादेश झुगारल्याचे गंडांतर या पक्षाच्या नगरसेवकांवर आल्याने त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी बनली आहे. यासंबंधी मनसेचे गटनेते सुधाकर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देण्याचे टाळले.