नाटय़-चित्रपट क्षेत्रात काम करताना कलावंतांनी पैशासाठी वाट्टेल ती कामे करू नये. पैसा कमी पडलाच, तर स्वत:च्या गरजा कमी कराव्यात, असा सल्ला देत, माणूस म्हणून कलावंतांचे पाय अखेर जमिनीवरच असले पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका आघाडीच्या अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी येथे मांडली.
गुरुवारी एका कार्यक्रमासाठी मधुरा वेलणकर सोलापुरात आल्या असता त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघास भेट देऊन पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्या वेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपली मते स्पष्टपणे मांडली. नाटक-चित्रपट क्षेत्रात कलाकारांचा कामापेक्षा वावर महत्त्वाचा असतो. त्यातून त्याचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. कलाकारांनी केवळ ग्लॅमरसच्या मागे न धावता स्वत:ची मेहनत, साधना कायम ठेवावी. ग्लॅमर कामामुळे निश्चितपणे मिळते, याचे भान बाळगलेले बरे, असे त्यांनी नमूद केले. अभियनकलेच्या प्रांतात आपण काहीही न ठरविता आलो. प्रदीप वेलणकरांची मुलगी म्हणून ‘मृण्मयी’ या पहिल्या मालिकेच्या वेळी आपले कौतुक झाले. या क्षेत्रात प्रगती करू, याबद्दल विश्वास नव्हता. आई-वडील, आजी-आजोबांचा थोडाबहुत वारसा तथा संस्कार मिळाले. त्याच बळावर पुढे जात असताना आत्मविश्वास बळावताना अतिआत्मविश्वास बाळगला नाही, असे मधुरा वेलणकर यांनी सांगितले.
गाजलेल्या आणि पुरस्कारप्राप्त ‘लग्नबंबाळ’ प्रयोगासाठी वेळ देताना ओढाताण न करता पूर्णत: याच नाटय़प्रयोगाकडे लक्ष केंद्रित केले. अभिनय क्षेत्रात दररोजचा दिवस भरलाच पाहिजे, असे काही केले नाही. अभिनय क्षेत्रात येणारी नवीन पिढी सक्षम बनत असताना त्यांना अभ्यास, परिश्रम करावे वाटत नाही. सर्व काही शॉर्टकट मिळायला हवे अशी भावना बळावत चालल्याबद्दल मधुरा वेलणकर यांनी खंत व्यक्त केली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज व्हटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी विठ्ठल बडगंची हे उपस्थित होते.