कलाकारांनी केवळ आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या अभिनयाबाबत गंभीर असणे गरजेचे असल्याचे मत दिग्दर्शक राजीव पाटील यांनी येथे बोलताना व्यक्त केले. येथील आदित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित अभिनय कट्टय़ावर दिग्दर्शक राजीव पाटील, अभिनेत्री स्मिता तांबे आणि संगीतकार अमितराज यांनी येऊन उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.
आगामी ‘७२ मैल -एक प्रवास’ या चित्रपटाच्या निमित्ताने या सर्वाना या कटय़ावर निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना राजीव पाटील यांनी कलाकारांची निवड तसेच त्यांचा अभिनय यावर परखडपणे भाष्य केले. जोगवा साठी अभिनेता उपेंद्र लिमये यालाच का घेण्यात आले या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलताना पाटील यांनी जोगवाच्या त्या भूमिकेला केवळ उपेंद्र न्याय देऊ शकतो हे मी अभ्यासाअंती जाणले होते आणि त्या व्यक्तिरेखेचे उपेंद्रने चीज केल्याचे सांगितले. त्यामुळे कोणताही कलाकार हा केवळ आपल्या अभिनयाबाबतच नेहमी गंभीर असला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. अशोक व्हटकर यांच्या गाजलेल्या ७२ मैल -एक प्रवास या कादंबरीवर ७२ मैल – एक प्रवास हा चित्रपट तयार करण्यात आला असून त्यामधील स्मिता तांबे हिची निवडही योग्य असल्याचे पाटील यांनी सांगितले. ७२ मैलमधील राधाक्काची भूमिका जगविताना सुरुवातीला खूप दडपण आले होते, पण ते दिग्दर्शक राजीव पाटील यांनी दूर केले असे यावेळी स्मिता तांबे हिने सांगितले. तर दुनियादारीमधील गाजलेल्या गाण्यानंतर तेवढय़ाच तोडीची गाणी या चित्रपटात असल्याचा दावा संगीतकार अमितराज यांनी केला. याप्रसंगी कट्टय़ावरील काही कलाकारांनी आपली कला सादर केली.