उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या कार्यक्रमाला ३ जूनपासून सुरुवात होत असून, अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात खा. माणिकराव गावित यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम राहणार आहेत.
कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मेश्राम यांनी ‘प्रयोगशाळा ते जमीन’ हा उपक्रम सुरू केला. ग्रामीण आणि आदिवासी भागात जैवतंत्रज्ञानाचा प्रसार, उपयुक्तता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वत: कुलगुरूंनी दीड वर्षांत १५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेऊन जैविक व कीटकनाशकांचा वापर कसा करता येईल व त्यामुळे होणारे फायदे, उत्पादनात वाढ आदीबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. आता मेळाव्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘प्रयोगशाळा ते जमीन’ या उपक्रमाची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून झाली होती. त्यावेळी मेळाव्यात सहभागी झालेल्यांपैकी २० शेतकऱ्यांची पहिली तुकडी या प्रशिक्षणात सहभागी होणार आहे.