शासन व साखर कारखानदारांकडून ऊसदर वाढ मागणीचा पोरखेळ सुरू असल्याच्या नाराजीच्या भावनेतून गतवर्षीप्रमाणे संतप्त आंदोलनाचा भडका होण्याची चिन्हे दिसू लागली असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुन्हा आंदोलनासाठी जंगी तयारी सुरू आहे. संघटनेच्या नेत्यांनी येथील प्रीतिसंगमावरील वाळवंटात आंदोलन करण्याची मागणी लावून धरली आहे.

पालिकेने ही जागा आपल्या अखत्यारित येत नसल्याचे स्पष्ट करून टोलवण्याची भूमिका कायम ठेवली आहे. यावर तहसीलदारांकडे अर्ज, विनंती केली असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रीतिसंगमावर ठिय्या आंदोलनास नापसंती दर्शवून मलकापूर अथवा सैदापुरात आंदोलनला वाट दाखवली असल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले. उद्या शुक्रवारी (दि. २२) सकाळी दुचाकी महारॅली वाठार येथून निघेल, कृष्णा कारखाना व तद्नंतर सह्याद्री कारखाना येथे निवेदन देऊन कराडमध्ये येईल. या रॅलीचे नेतृत्व सदाभाऊ खोत करणार असल्याचे पंजाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, हंगाम लांबल्याने ऊसउत्पादक व एकूणच साखर उद्योगात अस्वस्थता असून, ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होऊ लागला असून, ऊसदराचा तोडगा न्याय व सत्वर व्हावा याकडे साऱ्यांचे लक्ष्य आहे. याकामी मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी पंतप्रधानांकडे केलेल्या प्रयत्नांची व त्यासंदर्भातील भूमिकांबाबत एकच चर्चा ऐकावयास मिळत आहे.
कराड तालुक्यातील ऊसतोड ठप्प असल्याचे चित्र आहे. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात काही अंशी ऊसगाळप होत असल्याची कबूली पंजाबराव पाटील यांनी दिली आहे. आज दुपारी महामार्गावर काशिळ ते अतीत येथे अजिंक्यतारा साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकांची हवा सोडण्यात आली. यावर संतप्त झालेले अजिंक्यताराचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले तेथे आले आणि आंदोलकांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक उडाल्याचे पाटील यांनी सांगितले. ऊसदरावर योग्य तोडगा निघण्यास कमालीचा विलंब होत असून, २५ टक्के हंगाम वाया गेल्याने ऊस उत्पादकांत अन्यायाची तसेच फसवणुकीची भावना निर्माण होऊ लागली आहे. परिणामी, गतवर्षीप्रमाणे तीव्र आंदोलनाचा भडका उडतो किंवा काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्वाभिमानीचे नेते तर आंदोलनाचे रान उठवण्यासाठी ताकदीने प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

येत्या रविवारी (दि. २४) सायंकाळपासून स्वाभिमानीच्या कराड येथील ठिय्या आंदोलनाला प्रारंभ होईल आणि दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतरावांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संबंधितांना जाब विचारण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे संकेत पंजाबराव पाटील यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांची सहनशीलता संपली असून, पोलीस व प्रशासन असहकार्य करत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. साखर आयुक्तांनी काल महाराष्ट्रातील ६० कारखाने चालू असल्याचे सांगून गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात सरासरी अडीच लाख टन ऊसगाळपाची क्षमता आहे. मात्र, सध्या प्रत्यक्षात १५ हजार टन गाळपासाठी उपलब्ध होत असल्याचे सांगत ऊसदराचे आंदोलन आक्रमक केल्याखेरीज ऊसउत्पादकाला न्याय मिळणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.