महिला शौचालयाच्या गंभीर प्रश्नांबाबत सातत्याने लढा देत असलेल्या ‘राइट टू पी’ मोहिमेचे यश आता प्रत्यक्षात दिसण्यास सुरुवात झाली असून नवीन रचनेचे पहिले शौचालय चेंबूर येथील अणुशक्ती बस आगारात बांधण्यात येत आहे. यासाठी केवळ तांत्रिक परवानगीची पूर्तता राहिली असून महिन्याभरात शौचालयाचे बांधकाम सुरू होईल.सार्वजनिक शौचालयांच्या कमतरतेसोबत त्याची रचनाही स्त्रियांसाठी कायम त्रासदायक राहिली आहे. अंधार, घाण, असुरक्षितता हे मुद्दे कायम सार्वजनिक शौचालयांसोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे शहरातील शौचालयांची संख्या वाढवतानाच ती महिलांसाठी योग्य व सुरक्षित असावीत यासाठी पालिका व राइट टू पी मोहिमेतील सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी नवीन आराखडा तयार केला. या नवीन संरचनेचे पहिले आदर्श शौचालय बांधण्यासंदर्भातील सर्व पाहणी पूर्ण झाली असून जूनच्या अखेपर्यंत त्याचे बांधकाम सुरू होईल, अशी माहिती राइट टू पीच्या कार्यकर्त्यांनी दिली. शहरात महानगरपालिकेने ७१ ठिकाणी, सामाजिक संस्थांनी २५ ठिकाणी तर बेस्ट उपक्रमातील आगारांमध्ये ५१ जागा सुचविण्यात आल्या आहेत. त्यातील काही ठिकाणी शौचालय बांधण्यासंदर्भात पालिका व राइट टू पीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र पाहणी केली आहे.

या सोबतच चेंबूर येथे नवीन रचनेचे शौचालय बांधण्याचा आराखडाही शेवटच्या टप्प्यात आहे. नवीन रचनेत अनेक लहान पण महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल वास्तवात किती उपयोगी ठरतात, आणखी कोणत्या बदलांची गरज आहे हे चेंबूर येथील उदाहरणानंतर ठरवता येईल. त्यामुळे भविष्यात सर्व शहरांत उभारली जाणारी शौचालयांबाबत नव्या रचनेची मदत घेतली जाईल, असे राइट टू पीच्या कार्यकर्त्यां मुमताज शेख यांनी सांगितले.
शौचालयांची नवीन रचना
* महिला व पुरुषांसाठी वेगळे प्रवेशद्वार असेल, त्यामुळे सर्व स्तरांतील महिलांना शौचालयाचा वापर करताना साशंकता राहणार नाही.
*अपंग महिलांसाठी वेगळ्या सीट व रॅम्प असतील.
* सोबतच्या लहान मुलांना दोन मिनिटे बाहेर बसवण्यासाठी पट्टा लावण्याची जागा ठेवली जाईल.
* आत असलेल्या महिलेला आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळावी यासाठी बेल लावली जाईल.
* पुरुषांप्रमाणेच महिला विभागातही मुतारींची संख्या वाढवली जाईल. शौचकूप व मुतारी यांचे प्रमाण समसमान असावे.
* महानगरपालिकेचा लोगो व संस्थेचे नाव लावण्यासाठी एकच जागा व पद्धत ठरवावी.
* दिवसातून किती वेळा स्वच्छता झाली, साहित्याचा पुरवठा किती आहे याबाबत तक्त्यावर खूण करावी. पालिकेकडून दिली जाणारी श्रेणीही त्यावर लिहावी.
* नुक्रमांक असलेली तक्रारवही ठेवावी.