उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. जायकवाडी धरणात बाष्पीभवनाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठवाडय़ात नांदेड जिल्ह्य़ातील विष्णुपुरी निम्न मनार व मराठवाडय़ाला लागून असणाऱ्या ऊध्र्व पैनगंगा प्रकल्पात काहीअंशी पाणीसाठा आहे. अन्य सर्व प्रकल्प कोरडेठाक पडल्याने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आता टँकरवर आली आहे. चालू आठवडय़ात दोन हजार १३७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत यात १०९ टँकरने वाढ झाली.
उस्मानाबाद व जालना शहरातील पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन नुकतेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. उस्मानाबाद शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा सुरू झाल्याने शहरात सुरू असणारे टँकर कमी झाले. जालना शहरात अजूनही २७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाडय़ातील ग्रामीण भागात २ हजार ८७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भोकरदन, माहूर, तुळजापूर, लोहा व भोकर या शहरात ५० टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मे अखेरीस किमान ४ हजार टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, असा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे पाणीटंचाईची तीव्रता थोडी का होईना, कमी झाली.
मराठवाडय़ातील १ हजार ६७४ गावांना १ हजार ९७९ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे, तर १५८ शासकीय टँकर पाणीपुरवठय़ासाठी वापरले जात आहेत. सर्वाधिक टँकरची संख्या औरंगाबाद जिल्ह्य़ात असून ६७५ टँकरने ५०१ गावे व २६ वाडय़ांना पाणीपुरवठा केला जात आहे. ४ हजार ३८९ खासगी विंधन विहिरी अधिग्रहीत केल्या असून टँकर व चारा छावण्यांवर दररोज कोटय़वधी रुपये खर्च होत आहे.
रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांमुळे जालना व उस्मानाबाद शहरांत टँकरने पाणीपुरवठा होत होता. योजना पूर्ण झाल्याने उस्मानाबाद शहरातील टँकर पूर्णत: बंद झाले. जालना शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर तेथील टँकरही बंद केले जातील. धरणे कोरडी पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असे चित्र एका बाजूला असले तरी शहरातील पाणीटंचाई पाणी संपल्याने नव्हे तर योजना रखडल्याने निर्माण झाली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील औरंगाबाद, पैठण, गंगापूर व सिल्लोड तालुक्यात शंभराहून अधिक टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक १३६ टँकर सिल्लोड तालुक्यात आहेत. जालना जिल्ह्य़ात जालना व भोकरदन येथे शंभराहून अधिक टँकर आहेत.
अंबड व घनसावंगीत टंचाईची तीव्रता वाढली आहे. बीड जिल्ह्य़ात बीड व आष्टी तालुक्यात शंभराहून अधिक टँकर आहेत. आष्टीत सर्वाधिक १४७ टँकरची नोंद आहे. उमरगा, उस्मानाबाद येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने टँकरची संख्या तुलनेने कमी झाली आहे.