राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या आग्रहास्तव कळव्याच्या नाक्यावर उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती संरक्षणार्थ डेकोरेटिव्ह संरक्षक भिंत उभारण्यासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च तातडीने मंजूर करण्यात आला असून, कोणत्याही निविदा प्रक्रियेविना मेसर्स एल.के. देवळे या ठेकेदारास हे काम बहाल करण्याचा धक्कादायक निर्णय आयुक्त असीम गुप्ता यांनी घेतला आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार हे काम विनानिविदा बहाल करण्यात आल्याचा दावा अभियांत्रिकी विभागामार्फत केला जात असला, तरी यासंबंधीच्या कामाची पूर्वकल्पना महापालिकेस नव्हती का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. आमदार आव्हाडांच्या आग्रहापुढे मान तुकवत स्थायी समितीत हे प्रकरण मंजूर होण्यापूर्वीच संबंधित ठेकेदाराने कामास सुरुवात केल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली असून, महापालिका आणि ठेकेदारावर महापालिकेने केलेली असीम माया नव्या वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महापालिका अधिनियमातील अनुसूचीतील (ड) प्रकरण ५ (२)मधील नियमानुसार अतिशय आपत्कालीन परिस्थितीवेळी कोणत्याही निविदेशिवाय एखादा ठेका देण्याचे पूर्ण अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. असे प्रकरण माहितीसाठी स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेपुढे सादर केले जावे, अशी या अधिनियमात तरतूद आहे. त्यानुसार नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत अभियांत्रिकी विभागाने हे प्रकरण मंजुरीसाठी ठेवले असता आव्हाडांच्या या प्रकल्पासाठी शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी त्यास एकमुखी पाठिंबा दिला. त्यामुळे सुमारे ६० लाख रुपयांच्या या कंत्राटाभोवती संशयाचे धुके अधिकच गडद होऊ लागले असून, महापालिकेतील एकूणच कामकाजाविषयी उलटसुलट प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कळव्यातील चौकात आव्हाडांनी एका खासगी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला असून, या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती येणार आहेत. मुळात काम सुरू असताना कळव्यातील एकमेव अशा नाना-नानी पार्कचा संबंधित ठेकेदाराने अक्षरश: उकिरडा केल्यामुळे येथील रहिवासी महापालिकेच्या नावाने खडे फोडताना दिसत आहेत. तरीही महापालिका प्रशासनाला त्याचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रपती येणार म्हणजे उद्यानाचे रुपडेही पालटणार, असा दावा महापालिकेमार्फत केला जात असून, पुतळ्याभोवती संरक्षक भिंत उभारण्याचे काम महापालिका करणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी १५ दिवस या सर्व परिसरातील कामे पूर्ण करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याभोवती संरक्षक भिंत असायला हवी, असा साक्षात्कार चार दिवसांपूर्वी अचानक अभियांत्रिकी विभागास झाला आणि सुमारे ६० लाख रुपयांचे काम एल.के. देवळे यांच्या कंपनीस विनानिविदा देण्याचा प्रस्ताव घाईघाईत मंजूर करण्यात आला. राष्ट्रपतींचा नियोजित कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी ठरला असून, ६० लाखांची भिंत उभारण्याचा प्रस्ताव १४ डिसेंबर रोजी मंजूर करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार १३ डिसेंबरपूर्वीच हे काम पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र त्यास १४ डिसेंबर रोजी मान्यता घेण्यात आली. म्हणजेच मंजुरीपूर्वीच या कामास सुरुवात झाल्याचे चित्र पुढे येत असून आव्हाडांवर दाखविण्यात येणारी ही असीम माया म्हणजे महापालिकेच्या नियोजनशून्य आणि बोटचेप्या कारभाराचा नमुना असल्याची चर्चाही रंगली आहे. महाराजांचा पुतळा उभारायचा म्हणजे संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्वीच ठरले होते. असे असताना यासंबंधी यापूर्वी निविदा का काढल्या गेल्या नाहीत, हा सवालही अनुत्तरित राहिला आहे. यासंबंधी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे नेहमीच्या पठडीतील उत्तर दिले.