* ‘विद्रोही शाहिरी जलसा’ नावावरूनही वाद
*  नाटय़निर्माता संघाकडे तक्रार दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहीर संभाजी भगत यांच्या पुढाकाराने सुरू झालेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ नाटक वेगळ्याच वादात सापडले आहे. ‘अद्वैत थिएटर्स’ या बॅनरखाली चालू असलेल्या या नाटकाच्या जाहिरातींमधून अचानकपणे या बॅनरचे नाव दिसेनासे झाले. त्यानंतर अद्वैत थिएटर्सचे सर्वेसर्वा निर्माता राहुल भंडारे यांनी नाटकाचे दिग्दर्शक व नव्याने बनलेले निर्माते नंदू माधव यांच्याविरोधात तक्रार करणारे पत्र नाटय़निर्माता संघाकडे दाखल केले आहे. विशेष म्हणजे शाहीर संभाजी भगत यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या नाटकाच्या श्रेयनामावलीत त्यांच्या ‘विद्रोही शाहिरी जलश्या’चे नाव देण्यासाठीही संघर्ष करावा लागल्याची माहिती पुढे आली आहे.
‘शिवाजी अंडरग्राऊंड..’चे पहिले चार प्रयोग संभाजी भगत यांनी स्वखर्चाने केले. त्यानंतर नाटकाला एक बॅनर हवा होता. मात्र कोणताही निर्माता हे वादग्रस्त नाटक करण्यास तयार नसताना आपण त्याच्या मागे उभे राहिलो, असे भंडारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मात्र माधव यांनी हळूहळू आपल्याला बाजूला करून त्यांच्या ‘पब्लिक ओपिनीयन प्रॉडक्शन’चे नाव पुढे करण्यास सुरुवात केली. आता राज्य नाटय़ स्पर्धेबरोबर इतर स्पर्धा व त्यांच्या पारितोषिकांची रक्कम समोर दिसू लागल्यानंतर आपल्याला रितसर बाजूला करण्याचा डाव असल्याचे भंडारे यांचे म्हणणे आहे. हे नाटक सामाजिक आशयाचे आणि चळवळीसाठी असल्याचे सांगणारे माधव प्रयोगाचे एक एक लाख रुपये घेतात व हजार रुपयांची तिकिटे लावतात, अशी टीकाही त्यांनी केली.
याबाबत माधव यांच्याशी संपर्क साधला असता, नाटकाच्या सुरुवातीपासूनच आपण सर्व प्रक्रियेत सहभागी होतो. पहिले चार प्रयोग करण्यासाठी केवळ शाहीर संभाजी भगत यांनीच नाही, तर आपणही पैसे टाकले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘अद्वैत’चे नाव हा केवळ तांत्रिक मुद्दा होता. त्यांचे नाव लावण्यासाठी प्रति प्रयोग आपण त्यांना हजार रुपये दिले आहेत, असेही ते म्हणाले. आता नाटकाचा जोर वाढल्यानंतर सर्वच जण श्रेय लाटायला पुढे आल्याचा आरोप त्यांनी केला.
‘शिवाजी’ बंद पडू नये
हे नाटक कोणत्याही एका माणसाच्या जोरावर उभे नाही. नाटक उभे राहण्यासाठी खेडय़ातल्या लोकांनी पैसे दिले आहेत. अनेकांनी आम्हाला फुकट भाकऱ्या दिल्या. असे नाटक केवळ अशा वादांमुळे बंद पडू नये, म्हणून आपण कधीच काहीच बोललो नाही. आपल्या बोलण्याने ‘शिवाजी’ बंद पडावा, अशी आपली इच्छा नाही. नाटकातला विचार पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचत राहावा, असेच आपल्याला वाटते. – शाहीर संभाजी भगत.