विविध प्रलंबित मागण्यांसाठी अधिसभा सदस्य आणि विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा नेला, आंदोलनकर्त्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.
अधिसभेचे सदस्य, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी असे दिडशेहून अधिकजण या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. विद्यापीठातील जयकर ग्रंथालयापासून कुलगुरू कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरूंना दिले.
विद्यापीठामध्ये असलेल्या समस्या, तक्रारी सोडवण्यासाठी ‘जनअदालत’ सारखा उपक्रम राबवण्याचा विद्यापीठ विचार करत असल्याचे डॉ. गाडे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करण्यात येणार नसल्याचा निर्वाळाही डॉ. गाडे यांनी यावेळी दिला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्याचप्रमाणे पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर करण्यासाठी कालावधी निश्चित केला जाईल, अशी आश्वासने डॉ. गाडे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.