हिंदी असो वा मराठी चित्रपट.. चित्रपटातील गाणी हा त्यांच्या प्रसिध्दीचा एक मोठा भाग असतो. चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच त्यासाठी मोठमोठे ‘म्युझिक लॉंच’ सोहळे आयोजित केले जातात. मग त्यानंतर रेडिओ, टीव्ही आणि ऑनलाईनवर नव्या चित्रपटांची गाणी सातत्याने वाजत राहातात. गाणी लोकप्रिय झाली की त्यांचे संगीत हक्क विकले जातात, निर्मात्यांनाही त्यातून पैसा मिळतो. इतके मोठे प्रसिध्दीचे आणि आर्थिक गणित चित्रपटांच्या संगीताशी जोडलेले असतानाही ‘धूम ३’ ची गाणी कुठेही वाजणार नाहीत, अशी दवंडी यशराजकडून पिटवण्यात आली आहे.
एरव्हीही असे चित्रविचित्र पायंडे पाडणाऱ्या यशराज बॅनरने गाण्यांच्या बाबतीतही असा टोकाचा निर्णय घेण्यामागेही पुन्हा एकदा प्रसिध्दीचेच गणित असल्याचे समजते. कारण, यावेळी ‘धूम ३’ च्या प्रसिध्दी कार्यक्रमाच्या आयोजनात केवळ यशराजचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राचेच डोके लागलेले नाही तर चित्रपटातील मुख्य कलाकार मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही त्याला हातभार लावला आहे. त्यामुळे सगळं जग आपल्या चित्रपटांची गाणी वाजवून प्रसिध्दी करतं. पण, आपण कशाला तसं करायचं?, असा उलटाच किडा त्यांच्या डोक्यात वळवळतो आहे. एरव्ही चित्रपटाचे एकेक तपशील हळूहळू उलगडत त्यांची प्रसिध्दी केली जाते. यावेळी आपण नेहमीच्या सगळ्याच तंत्रांना फाटा द्यायचा असा दृढनिश्चय या जोडगोळीने केला आहे.
‘धूम ३’ ची गाणी दाखवायची म्हणजे चित्रपटातील गाण्यांची दृश्येही ओघाने दाखवली जाणारच. शिवाय, गाणी किती चांगली आणि किती वाईट याच्यावरही तर्कवितर्क  लढवले जाणार. एकूणच चित्रपटाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न होणार. त्यापेक्षा आपण चित्रपटाविषयी काही म्हणजे काहीच बोलायचे नाही. येऊ दे प्रेक्षकांना चित्रपटगृहात मग कळेल त्यांना ‘धूम ३’ (की आमिर?) काय चीज आहे ते.. असा तिरपागडा विचार करून या दोघांनीही ‘धूम ३’ ची गाणी वाजणार नाहीत, असे जाहीर क रून टाकले आहे. आता त्यांची ही रणनीती त्यांनाच उलट महागात पडली नाही म्हणजे मिळवले..