पनवेल परिसरातील लहानमोठय़ा डोंगरांमुळे खडकातून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे येथे लहानमोठे धबधबे निर्माण झाले आहेत. त्यापैकी एक भिंगार येथील माचीप्रबळ हा परिसर आहे. येथे प्रशासनाचे लक्ष्य नसल्यामुळे येथे चुलीवर मांसाहार बनवून मद्याचा आनंद लुटण्यासाठी चंगळवादी गटारी निमित्ताने जमा होतात. पंरतु गटारीनंतर येथील फुटलेल्या दारूच्या बाटल्या येथे पसरलेल्या काचा यांचा त्रास येथील आदिवासी बांधवांना रोज घराच्या वाटेकडे जाताना भोगावा लागतो.  
पनवेल परिसरामधील चंगळवादी संस्कृतीने गटारीच्या पाटर्य़ासाठी बार अ‍ॅण्ड रेस्ट्रोरेन्ट आणि ढाब्यांचे टेबल बूक केले. तसेच काहींनी फार्महाऊसमध्ये गटारीचे आयोजन केल्याने गटारीमुळे दूसऱ्या दिवशी उद्भवणारी नैसर्गिक दुर्दशा, दरुगधीमुळे पनवेलच्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.
मद्यपींना जसे पाटर्य़ासाठी चांगले वाईटनिमित्त हवे असते त्याप्रमाणे गटारी हे एक निमित्त आहे.  कोंबडी, माशांची आवक नसतानाही हजारो नग माशांचे विक्री आणि शेकडो बकरे या गटारीच्या नावाने कत्तली केल्या जातात.
कर्नाळा मार्गावर जाताना येथील ढाबे मांसाहारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अशा ढाब्यांवरही मद्यसेवन करून चिकन खाण्यासाठी चांगलीच रिघ गटारीनिमीत्ताने पाहायला मिळते. परंतु येथील ढाबेमालकही गटारीनंतरचा कचरा थेट जवळच्या ओढय़ात टाकून देतात. येथे प्रशासनाचा कोणताही अधिकारी कारवाईसाठी धजावत नाही. परंतु येथील चिकन चव या अधिकाऱ्यांना माहिती असते. निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या या गटारी हॉटस्पॉटचे निसर्गाला वेदना देणारे हे चित्र आहे. विशेष म्हणजे ढाबेमालकांप्रमाणे सिडको वसाहतीमधील बार अ‍ॅण्ड रेस्ट्रोरेन्टमधील टेबल बूक करून गटारी साजरी करण्याकडे चंगळवाद्यांची योजना असते. परंतु हे रेस्ट्रोरेन्ट मालकही थेट कचरापेटीमध्ये आपले उरलेले अन्न व इतर टाकाऊ पदार्थ टाकतात. टाकाऊ अन्नावर प्रोसेसकरून प्राण्यांच्या खाद्यासाठी याचा उपयोग व्हावा, असे सिडकोच्या आरोग्य विभागाने या रेस्ट्रोरेन्ट मालकांना अनिवार्य न केल्याने ही वेळ आली आहे.