आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या विद्यार्थी संख्येत दहा पटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी
होणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत राज्य सरकारने यासाठी येणारा खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात या संदर्भात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभत आहे.
फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास तसेच शैक्षणिक दर्जा याविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीने नामांकित शाळांमध्ये दरवर्षी पाठविण्यात येत असलेल्या २५०० विद्यार्थ्यांची संख्या १० पटीने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार येत्या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सुमारे २५ हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी शासनाने आपल्या नियमावलीत काही बदल केले आहेत. यामध्ये, विद्यार्थ्यांना पहिली तसेच पाचवी या दोन टप्प्यावर प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने महापालिका, जिल्हा, तालुकास्तरासह अन्य अशी वर्गवारी केली आहे. दारिद्रय़ रेषेखालील गरजू आदिवासी विद्यार्थी योजनेत सहभागी होऊ शकतात. यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भात नाशिक जिल्ह्य़ात ब्रह्मा व्हॅली, येवला येथील एस.एन.डी. इंग्रजी निवासी शाळेचा प्रस्ताव आलेला आहे. योजनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थी निवडण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्यांना किमान एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर विद्यार्थ्यांना अर्ज वाटप करण्यात आले असून जाहिरातीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार प्रवेश
राज्य शासनाच्या तसेच आदिवासी आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक विभागात प्रवेश प्रकियेला सुरुवात झाली आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांना थेट प्रवेश तर पाचवी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. पालकांच्या आर्थिक क्षमतेवर तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीवर हा प्रवेश होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेत सहभागी व्हावे.
-अनिल मराठे
(साहाय्यक प्रकल्प अधिकारी)

राज्य सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्यांमागे होणारा खर्च
*महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा-५० हजार
* जिल्हास्तर कार्यक्षेत्रातील शाळा – ४५ हजार
* तालुकास्तर व अन्य शाळा- ४० हजार
* महाबळेश्वर, पाचगणी, चिखलदरा, पन्हाळा, लोणावळा या थंड हवेच्या ठिकाणच्या शाळा ५० हजार