कराडनजीकच्या मलकापूर येथील आनंदराव चव्हाण माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या चार हजार विद्यार्थ्यांनी फटाके व प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली. दरम्यान, गेली पाच वष्रे संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जातो. दीपावली सणासाठी भेसळयुक्त पदार्थ खरेदी न करता सर्व पदार्थ घरातच तयार करा, असे आवाहन करणारे पत्रक दरवर्षीप्रमाणे घरोघरी वाटप केले जात आहे.
फटाके खरेदी न करता त्या पैशाची बचत करून गरीब लोकांना मदत, खेळणी, वाचनासाठी पुस्तके खरेदी करून द्यावीत. वृक्षारोपणासाठी तो पैसा वापरा, असे आवाहन मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी केले आहे. यावेळी मुख्याध्यापक आर. आर. पाटील, उपमुख्याध्यापक एस. वाय. गाडे, एस. वाय. राजे, शेखर शिर्के, हरितसेनेचे प्रमुख बी. आर. पाटील, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.