राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रशासन आणि प्राध्यापकाच्या संगनमतामुळे संशोधक महिला प्राध्यापकाचा गेल्या पावणेतीन वर्षांपासून मानसिक छळ सुरू असून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या त्या सहयोगी प्राध्यापकाने छळाला कंटाळून पीएच.डी.ची नोंदणी रद्द करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे.
विद्यापीठाच्या संशोधन मान्यता समितीत (आरआरसी) दबावाचे राजकारण करून माधुरी गावंडे यांना पीएच.डी.पासून वंचित ठेवण्याचे डावपेच प्रशासनाच्या मदतीने खेळले जात आहेत. गोंदिया जिल्ह्य़ातील आमगावचे भवभूती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी हा विषय विद्यापीठाकडे लावून धरला असून त्यांच्याच महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रल्हाद रहांगडाले आहेत तर सहयोगी प्राध्यापक माधुरी गावंडे आहेत. रहांगडाले रसायनशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्षही आहेत. माधुरी यांनी १६ जुलै २०१२ला पीएच.डीचा आराखडा (सिनॉप्सिस) विद्यापीठाला सादर केला. त्यांचा विषय रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या दोन्हीशी संबंधित आहे. म्हणून त्यांनी मार्गदर्शक म्हणून डॉ. रहांगडाले यांच्याऐवजी कामठीच्या पोरवाल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एम.बी. बागडे आणि सहमार्गदर्शक म्हणून त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांची रितसर परवानगी काढली आहे.
आदिवासी जंगलातील झाडे, औषधीवनस्पतींचा कोणत्याच पुस्तकांमध्ये संदर्भ नाही. त्यांच्यातील औषधी तत्त्व रासायनिक पृथक्करणाने वेगळे करून नवीन औषधे निर्माण करणे यावर माधुरी गावंडे यांना गोंदिया जिल्ह्य़ात संशोधन करायचे आहे. मुख्य म्हणजे माधुरी गावंडे यांनी याच कामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची संशोधनवृत्ती देखील यापूर्वी प्राप्त केली आहे. असे असतानाही त्यांच्या पीएच.डी.चा आराखडाच नामंजूर करून तो खिचपत ठेवण्याचा विद्यापीठाच्या आरआरसीचा प्रयत्न आहे. अंतर्गत राजकारणामुळे माधुरी गावंडे यांची पीएच.डी.साठीची नोंदणी गेल्या पावणे तीन वर्षांपासून लटकवून ठेवण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे हाच विषय असलेल्या पण संशोधनाचे कार्यक्षेत्र गडचिरोली असलेल्या दुसऱ्या एका संशोधकाला पीएच.डी. करण्यास आरआरसीने परवानगी दिली असून त्यांचा आराखडाही मंजूर केला आहे. याचाच अर्थ माधुरी गावंडे यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचे सिद्ध होते.
आरआरसीने गावंडे यांच्या पीएच.डी. सिनॉपसिसमध्ये थातुरमातूर त्रुटी काढून ते आंतरविद्याशाखीय मंडळाकडे विचारार्थ पाठवण्यात आले. मुळात आंतरविद्याशाखीय मंडळ विद्यापीठात अस्तित्वातच नसताना अशाप्रकारे खेळ करून पीएच.डी.साठी एखाद्या महिला प्राध्यापकाचा मानसिक छळच करीत आहे. त्यामुळेच माधुरी गावंडे यांनी स्वत:ची पीएच.डी. नोंदणीच रद्द करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे.
यासंदर्भात आरआरसीत महत्त्वाची भूमिका बजावणारे रसायनशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद रहांगडाले यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली आहेत. त्यांना आंतरविद्याशाखीय समिती की मंडळ यातील भेद माहिती नव्हता. नंतर आंतरविद्याशाखीय मंडळाकडे गावंडे यांचा सिनॉप्सिस सोपवण्यात आल्याचे ते म्हणाले. अशाप्रकारचे मंडळच अस्तित्वात नसले तरी जेव्हा ते स्थापन होईल, तेव्हा सिनॉप्सिसचा विचार करण्यात येईल, अशी असंवेदनशीलता त्यांच्या बोलण्यातून झळकत होती. मंडळाकडे सिनॉप्सिस पाठवण्याचा निर्णय माझा नसून आरआरसीमध्ये माझे वरिष्ठ अधिष्ठाताही असे ते बोलून गेले आणि नंतर मात्र त्यांनी सारवासारव करीत संशोधकाने कोणाकडून पीएच.डी.चे मार्गदर्शन घ्यावे, हा त्याच्याच निर्णय आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच माझ्या मार्गदर्शनाखाली न करता इतर कोणाच्याही मार्गदर्शनाखाली गावंडे यांनी पीएच.डी. केली तरी माझी काहीही हरकत नसल्याचे रहांगडाले यांनी स्पष्ट केले.