महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने नगर जिल्ह्यातून मुंबईसाठी वाळूची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू असून ही वाळूचोरी रोखण्यासाठी आता घोटी पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. सिन्नर फाटय़ावर वाळू वाहतूक करणारी वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली हे मात्र स्पष्ट झालेले नाही. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी अशा प्रकारे होत असलेल्या वाळू वाहतुकीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दोन महिन्यांपासून तालुक्यात अवैधपणे वाळू वाहतुकीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर फैलावला आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून ही वाळूची चोरटी वाहतूक मुंबई तसेच इगतपुरीसाठी होत आहे. या वाहतुकीकडे स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने हे प्रमाण दरदिवशी वाढत आहे.