लोटस आग प्रकरणानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाला एक वर्षांपूर्वी कावळ्याला वाचविताना मृत्युमुखी पडलेल्या उमेश पर्वतेचे स्मरण झाले. उमेश पर्वतेच्या नातेवाईकांना घोषित झालेल्या मदतीच्या फाईलवरची धूळ प्रशासनाने झटकली असून त्यांना १४.५० लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली.
गेल्या वर्षी मशीदबंदर येथे कावळ्याला वाचविताना ३० फूट उंचावरून अग्निशामक उमेश पर्वते खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांना १४.५० लाख रुपये मदत देण्याचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. परंतु पर्वते अविवाहित असल्यामुळे ही रक्कम कोणाला द्यायची, असा प्रश्न प्रशासनाला पडला होता. पर्वते कुटुंबियांनी मदतीची रक्कम उमेशच्या आईला द्यावी आणि अनुकंपा तत्वावरील नोकरी भावास द्यावी, असे प्रतिज्ञापत्र पालिकेला सादर केले आहे. लोटस पार्क घटनेनंतर प्रशासनाला पर्वते यांच्या मदतीच्या फाईलचे स्मरण झाले आहे. या मदतीच्या प्रस्तावाला प्रशासनाने आता तातडीने मंजुरी दिली आहे.लोटस पार्क आग विझविताना मृत्युमुखी पडलेले नितीन इवलेकर यांच्या कुटुंबाला एक महिन्यात १५ लाख रुपयांची मदत आणि पत्नीला अनुकंपा तत्वावर पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रशासनाला कालांतराने विसर पडतो. त्यामुळे नोकरी आणि देणी एक महिन्यात देण्याचे लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी इवलेकर यांच्या पत्नी शुभांगी यांनी केली होती. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी पतीचे पार्थिव ताब्यात घेतले. शुभांगी इवलेकर यांनी परिचारिका अभ्यसक्रम पूर्ण केला आहे. त्यामुळे त्यांना पालिका रुग्णालयात सामावून घेण्याचा विचार प्रशासन करीत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.