18 September 2020

News Flash

ग्रामविकास अधिकाऱ्यांऐवजी ग्रामसेवकांकडे कारभार

लोकसंख्या व उत्पन्न अधिक असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या वरदहस्तामुळे तालुक्यातील चार मोठय़ा ग्रामपंचायतींचा कारभार अनेक वर्षांपासून ग्रामसेवक पाहत

| December 19, 2012 02:32 am

लोकसंख्या व उत्पन्न अधिक असलेल्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या वरदहस्तामुळे तालुक्यातील चार मोठय़ा ग्रामपंचायतींचा कारभार अनेक वर्षांपासून ग्रामसेवक पाहत असल्याने ग्रामविकास अधिकाऱ्यांअभावी या चारही गावांचा विकास रखडला आहे. दुसरीकडे ग्रामविकास अधिकारी नसल्याचे छातीठोकपणे सांगणाऱ्या पंचायत समितीने ग्रामसेवक आवश्यक असलेल्या लहान ग्रामपंचायतीवर चक्क ग्रामविकास अधिकारी नेमण्याचा विक्रम केला आहे.
अनुभवी ग्रामसेवकाला सेवाज्येष्ठतेनुसार ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळते. तसेच ग्रामसेवकांना सेवातंर्गत परीक्षा दिल्यानंतरही ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मिळविता येते. कोणत्याही ग्रामविकास अधिकाऱ्यावर तीन हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावाची जबाबदारी टाकण्यात येते. असे शासनाचे निकष असताना इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी हे निकष धाब्यावर बसवल्याची तक्रार आहे. तीन वर्षांपासून तालुक्यातील चार मोठय़ा ग्रामपंचायतसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याऐवजी ग्रामसेवकावर त्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. तालुक्यातील नांदगाव सदो, वाडीवऱ्हे, घोटी बुद्रुक, खेड, भरवीर खुर्द व बुद्रुक, टाकेद बुद्रुक, धामणगाव, साकुर, मुंडेगाव, खंबाळे, काकुस्ते, आदी चौदा मोठय़ा ग्रामपंचायतीकरिता ग्रामविकास अधिकारी नेमण्याची आवश्यकता असून यातील मुंडेगाव, खंबाळे, साकुर आणि भरवीर बुद्रुक या गावांना ग्रामविकास अधिकाऱ्यांची नेमणूक न करता अनुभव नसलेल्या ग्रामसेवकांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याने या गावांचा विकास खुंटला आहे.
पंचायत समितीत आतापर्यंत आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. या ग्रामपंचायतींवर ग्रामविकास अधिकारी नेमण्याविषयी कोणतीही कार्यवाही होत नाही. याउलट सोमज ही ग्रामपंचायत ग्रामसेवकासाठी असताना येथे चक्क ग्रामविकास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
याबाबत नवीन नियुक्त प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने फेरबदल करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2012 2:32 am

Web Title: administration with village servant insted of village development officer
टॅग Development
Next Stories
1 जळगाव जिल्हा गृहरक्षक समादेशक निवडीचा वाद
2 ‘नागपूर आंदोलनात नाशिकचे वारकरीही सहभागी होणार’
3 वणी परिसरात घरफोडय़ांचे सत्र
Just Now!
X