परभणी महापालिकेच्या शिक्षण विभागात प्रभारी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ज्योती कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शाळेतील शिक्षकांकडून वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी प्रत्येकी ३ ते १० हजार रुपये घेतल्याचे त्यांनी कबूल केल्यानंतर प्रभारी आयुक्त एस. पी. सिंह यांनी कुलकर्णी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
महापालिकेच्या शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. उपोषणार्थीच्या मागण्यांबाबत आयुक्त तथा जिल्हाधिकारी सिंह यांनी आपल्या दालनात बठक बोलावली. या बठकीस आमदार संजय जाधव व विक्रम काळे यांची उपस्थिती होती. या वेळी महंमद मुनवर व इतर शिक्षकांनी कुलकर्णी यांनी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ३ ते १० हजार रुपये घेतल्याची तक्रार केली. त्या वेळी कुलकर्णी यांनी शिक्षकांकडून पसे घेतल्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले. निलंबनकाळात ज्योती कुलकर्णी यांचे मुख्यालय परभणी महापालिका राहणार असून, आयुक्ताच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे.