२२ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार , जिल्ह्यत ७९,६२० जागा
नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रियेस १५ जूनपासून सुरूवात होत असून २२ तारखेला संवर्गनिहाय पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. सलग २३ दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेत कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही इतपत प्रवेश क्षमता असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे. नाशिकमध्ये कला शाखेच्या ४५६०, विज्ञान ६६८०, वाणिज्य ६७२० आणि संयुक्तच्या ४८० अशा १८४४० तर ग्रामीण भागात कला ३१९६०, विज्ञान १८५६०, वाणिज्य ११६०० आणि संयुक्तच्या १८८० अशा ६४००० जागा असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात उत्तीर्ण झालेली विद्यार्थ्यांची संख्या ७२,९०२ इतकी असून अकरावीची उपलब्ध प्रवेश क्षमता ७९,६२० आहे. हे लक्षात घेतल्यास काही जागा अतिरिक्त ठरणार आहेत.
शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी सोमवारी येथील रावसाहेब थोरात सभागृहात प्राचार्याची बैठक झाली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. एल. सोनवणे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळांमार्फत १५ ते १९ या कालावधीत प्रवेश अर्ज वितरित करून ते पुन्हा जमा केले जातील. २२ जून रोजी सायंकाळी चार वाजता संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रतिक्षा यादी जाहीर केली जाईल. त्या दिवसापासून २६ जूनपर्यंत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना २७ तारखेपर्यंत प्रवेश दिला जाईल. उर्वरित जागा प्राप्त प्रवेश अर्जानुसार गुणानुक्रमे भरण्याचे काम एक जुलैपर्यंत होणार आहे. दोन जुलै रोजी शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याकडे अर्जाची यादी व संवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
या दिवशी प्रत्येक महाविद्यालयास चौदाव्या दिवसापर्यंत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी सादर करणे बंधनकारक आहे, असेही शिक्षण विभागाने सूचित केले आहे. आठ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश दिला जाईल. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात सहा हजारहून अधिक जागा उपलब्ध आहेत. यामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नसून उलट अतिरिक्त जागा रिक्त राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालक व विद्यार्थी काही विशिष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून आग्रही असतात. परंतु, प्रत्येक महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे कोणीही एका विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा म्हणून हट्ट धरू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या २,६२० जागा
दहावीनंतर पुढे काय, या विवंचनेत सापडलेल्या विद्यार्थ्यांना नियमित शाखांप्रमाणेच उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचीही संधी उपलब्ध आहे. तांत्रिक गटातील अभ्यासक्रमांचे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाल्यावर तंत्रनिकेतनच्या पदविकेसाठी थेट द्वितीय वर्षांसाठी पात्र ठरतात. नाशिक जिल्ह्यातील ४१ महाविद्यालयांमध्ये २६२० जागा उपलब्ध आहे. त्यात शहरातील केटीएचएम, जनता विद्यालय (सातपूर), शासकीय तांत्रिक विद्यालय, बिटको, लोकनेते व्यंकटराव हिरे, बीवायके, पुरूषोत्तम इंग्लिश स्कूल, एसएमआरके, के. जे. मेहता हायस्कूल आणि एचपीटी महाविद्यालयात ७८० जागा आहेत. इलेक्ट्रीकल टेक्नॉलॉजी, एम. एल. टी., ऑटो इंजि. टेक्निशियन, बिल्डिंग मेन्टेनन्स, विपणन व विक्री कौशल्य, अकौटींग अ‍ॅण्ड ऑडिटींग, पर्चेसिंग अ‍ॅण्ड स्टोअरकिपींग, पर्यटन व प्रवास तंत्र या अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. ग्रामीण भागातील जनता इंग्लिश स्कूल (सायखेडा, न्यू इंग्लिश स्कूल (चांदोरी), बी. के. कावळे स्कूल व जनता इंग्लिश स्कूल (दिंडोरी), कनिष्ठ महाविद्यालय (पेठ), सी. एस. विद्यालय (खेडगाव), महात्मा गांधी महाविद्यालय (इगतपुरी), कला, वाणिज्य महाविद्यालय (देवळाली कॅम्प), जनता विद्यालय (वडनेरभैरव), स्वामी मुक्तानंद विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल (येवला), न्यू इंग्लिश स्कूल (ताहराबाद), नेमीनाथ जैन विद्यालय (चांदवड), कला महाविद्यालय (वणी), पंडित धर्मा विद्यालय (लखमापूर), जी. एम. डी. कॉलेज व महात्मा फुले विद्यालय (सिन्नर), क. का. वाघ विद्या भवन (भाऊसाहेबनगर), कला महाविद्यालय (ओझर, मनमाड, सटाणा, देवळा व लासलगाव), केआरटी हायस्कूल (मौजे सुकेणे), जनता महाविद्यालय (घोटी), एमएसजी कॉलेज (मालेगाव), माधवराव बोरस्ते विद्यालय (लाखलगाव), क. का. वाघ महाविद्यालय (पिंपळगाव बसवंत), एचएएल विद्यालय (ओझरमीग), शासकीय तांत्रिक विद्याल (मालेगाव) या ३१ महाविद्यालयात १८४० जागा उपलब्ध आहेत. या ठिकाणी उपरोक्त अभ्यासक्रमांसह बॅकिंग, हॉर्टीकल्चर, विमाशास्त्र, कार्यालयीन व्यवस्थापक असे इतर काही शिक्षणक्रमही उपलब्ध आहेत. या संदर्भात अधिक माहितीसाठी उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पी. व्ही. पाटील यांच्याशी ९४०३५ १६६६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक शहरात अकरावीच्या १८४४० जागा
नाशिक शहरातील महाविद्यालयांतील जागा पुढीलप्रमाणे (कंसात अनुक्रमे कला, विज्ञान, वाणिज्य, संयुक्त) केटीएचएम महाविद्यालय (७२०,१३२०,१२००,०), बीवायके (०,०,९६०,०), एचपीटी व आरवायके (३६०, ८४०, ०, ०), एसएमआरके (१२०, २४०, ३६०, ०), व्हीएन नाईक (१२०, २४०, ३६०, ०), बॉईज टाऊन (०, ८०, ०, ०), फ्रावशी अकॅडमी (०, ८०, ८०, ०), डॉन बास्को (०, ८०, ८०, ०), सिल्व्हर ओक (०, ८०, ८०, ०), जनता विद्यालय, सातपूर (८०, ८०, ८०, ०), भोसला सैनिकी (०, ८०, ०, ०), भोसला महाविद्यालय (२४०, ३६०, २४०, ०), डी. एन. पाटील महाविद्यालय (८०, ०, ०, ०), लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय (३६०, २४०, २४०, ०), डी. डी. बिटको महाविद्यालय (८०, २४०, १६०, ०), वाय. डी. बिटको (१६०, ८०, १६०, ०), डॉ. काकासाहेब देवधर स्कूल (०, ८०, ८०, ०), श्री छत्रपती (८०, ८०, ८०, ०), नॅशनल उर्दू बॉईज (१६०, १६०, १६०, ८०), श्रीराम (८०, ०, ०, ०), साहस ब्लॉसन (०, ८०, ८०, ०), शांतारामबापू वावरे (२४०, ३६०, ४८०, ०), जी. डी. सावंत महाविद्यालय व श्रीसिद्धी विनायक (१२०, १२०, १२०, ०), ग्रामोदय (०, ८०, ०, १६०), मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय (०, ०, ८०, ०), सुखदेव काळे विद्यालय (८०, ८०, ८०, ०), डे केअर सेंटर (०, ८०, ८०, ०), हिंदी महाविद्यालय (०, ०, ०, ८०), गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय, नाशिकरोड (२४०, ६००, ४८०, ०), के. जे. मेहता हायस्कूल आणि ई. वाय. फडोळ कनिष्ठ महाविद्यालय (४००, १६०, ३२०, ०), आनंद महाराज (१२०, १२०, १२०, ०), आरंभ (१६०, १६०, २४०, ०), एस. के. पांडे (८०, ०, ८०, ०), के. एन. केला (०, ८०, ८०, . तेजुकाया (२४०, २४०, २४०, ०), नूतन विद्यामंदिर (१६०, ८०, ०, १६०), अ‍ॅग्लो उर्दू ( ८०, ०, ०, ० ), डॉ. सुभाष गुर्जर महाविद्यालय (०, ०, ८०, ०)