सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असलेले अॅड. शिवाजीराव जाधव यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी निश्चित होत असल्याचे चित्र सध्या मतदारसंघात रंगविले जात आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अॅड. जाधव सर्वोच्च न्यायालयात मराठी मोहोर म्हणून परिचित आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली व कामाची ओळख ते निर्माण करून देत आहेत. अॅड. जाधव यांनी १४ जून रोजी मतदारसंघातील वसमत, कळमनुरी, माहूर, उमरखेड, प्रत्येक तालुकास्तरावर विविध रोगनिदान, तर औंढा नागनाथ, माहूर येथे रक्तदान शिबिर घेतले. किनवट येथे आयोजित सामूहिक सोहळ्यात नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य दिले.
वसमत तालुक्यातील चौंढीआंबा येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे श्रमदानातून गाळ काढण्याचे काम पाहून ५० हजारांचा निधी गाळ काढण्याच्या कामास दिला. ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढ, शेतीमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना दूध डेअरीसारखा जोडधंदा, सोयाबीन, हळद याावर प्रक्रिया उद्योग उभारणे या विषयावर मार्गदर्शन, वाढविलेला जनसंपर्क पाहता त्यांची वाटचाल लोकसभेची निवडणूक लढविण्याचा भाग असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.