वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन मानवी जीवन सुखी करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी अशोका बिल्डकॉनचे संस्थापक अशोक कटारिया, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर, प्रतिकुलगुरू डॉ. शेखर राजदेरकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर उपस्थित होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना मंत्रभूमी असलेल्या नाशिक तीर्थक्षेत्रात झाली असून येथील हवामान आरोग्यदायी आहे. त्यामुळे या आरोग्यदायी वातावरणात लोकांच्या आरोग्याची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेतली जावी यासाठी विद्यापीठाने कार्य करणे गरजेचे असल्याचे जाधव यांनी सांगितले. कटारिया यांनी विद्यापीठामुळे नाशिकच्या वैभवात भर पडली आहे. विद्यापीठास सहकार्य करण्यास औद्योगिक क्षेत्राचे सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध नसल्याने त्यांना शहराकडे उपचारासाठी यावे लागते. ही दरी दूर होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आवश्यक आरोग्य सुविधा पुरविता येणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. जामकर यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या आजवरच्या जडणघडणीमध्ये माजी कुलगुरूंनी दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे, परंतु संख्यात्मकतेपेक्षा गुणात्मक वाढीसाठी विद्यापीठातर्फे पाऊल उचलण्यात आल्याचेही ते म्हणाले.
वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध संगीतकार संजय गिते यांचा ‘मनोसंगीत-सांगू मनाला, जिंकू जगाला’ हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.