‘अॅडव्हांटेज विदर्भ’  उपक्रम दरवर्षी घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तर बुटीबोरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर उभारण्याची घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी नागपुरात केली. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल, पालकमंत्री शिवाजीराव मोघे, जेएसडब्लू उद्योग समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल, रेमंड समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  गौतम सिंघानिया, भेलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. प्रसाद राव, मारुती सुझुकी समुहाचे प्रमुख आर. सी. भार्गव, फिक्कीचे अध्यक्ष रसेश शाह व्यासपीठावर उपस्थित होते. उद्योजकांच्या उत्साही प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रारंभीच कृतज्ञता व्यक्त केली.
शासनाने नवे औद्योगक तसेच वस्त्रोद्योग धोरण नुकतेच जाहीर केले. प्रत्यक्षात उद्योग सुरू होण्यात त्याचे रुपांतर होईल, अशी आशा आहे. नागपूर हे उपराजधानीचे शहर असल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्र्यांनी नागपूरसह विदर्भाची महती सांगितली. अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. भेल फॅब्रिकेशन व सिलिकॉन आधारित उद्योग सुरू करणार आहे. राज्यात दहा हजार कोटी रुपयांहून अधिक सबसिडी दिली जाते. अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट येऊ घातले आहेत. त्यामुळे येथे रोजगार नक्कीच वाढेल. देशात येणाऱ्या एकून विदेशी गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न आहे. कापूस उत्पादन क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात वस्त्रोद्योग यावेत, असा शासनाचा प्रयत्न आहे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ उपक्रम दरवर्षी केवळ विदर्भातच नाही तर राज्याच्या इतर भागातही घेतला जाईल. जागतिक बँकेने भारतीय अर्थ व उद्योग धोरण जगात अत्युकृष्ट आहे, अशी पावती दिलेली आहे. सौरउर्जाविषयक सवलती केंद्र शासनाकडून आणण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून ‘अॅडव्हांटेज विदर्भ’मधून व्यक्त झालेल्या सूचनांचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती विचार करून औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरण नव्याने तयार केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विदर्भात वीज दरात केवळ एक रुपया सवलत पुरेशी नाही तर त्याहून अधिक शक्य तेवढी मदत देऊन महाराष्ट्र शासनाला ठोस धोरण आखावे लागेल, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल पटेल यांनी केली. विदर्भात मोठय़ा प्रमाणात वीज तयार होते. त्याचा उद्योगवाढीसाठी योग्य वापर झाला पाहिजे. केवळ ‘डी प्लस’ नाही तर त्यापेक्षा जास्त सवलती द्या. राज्याच्या इतर भागांचाही विकास झाला पाहिजे, मात्र नागपूर शहराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बुटीबोरीसह मोठय़ा प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. देशाच्या जीडीपीमध्ये २५ टक्के वाटा एकटय़ा ऑटो इंडस्ट्रीजचा आहे. नागपुरात केवळ वाहनांच्या सुटय़ा भागाचे दुकान न उघडता मोठा उद्योग सुरू करा, अशी स्पष्ट मागणी पटेल यांनी उद्योजक भार्गव यांना केली. महाराष्ट्र शासनाचा उद्योगांविषयी घेतलेला पुढाकारही तेवढाच सशक्त असायला हवा. बंद पडलेले अनेक उद्योग सुरू होतील, याचाही विचार झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याचा उत्पादन विकास दर १३ टक्क्क्यांवर नेण्याचा प्रयत्न असल्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांत ३.२ लाख लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. पाच वर्षांत ५० हजार कोटी रुपये गुंतवणूक व्हावी, हे लक्ष्य आहे. नव्या औद्योगिक धोरणात विदर्भाला प्राधान्य आहे. नागपूर शहर सोडून उर्वरित विदर्भाला ‘डी प्लस’ तसेच नक्षलवादग्रस्त भागात विशेष सवलची देण्यात आल्या आहेत. बुटीबोरीत १५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारले जाणार असल्याची घोषणाही राणे यांनी केली.
प्रारंभी उद्योग खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलनाने ‘अॅडव्हांटेज विदर्भ’चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे संचालन कमला सोनटक्के यांनी केले. व्हीआयएचे अध्यक्ष प्रफुल दोशी यांनी आभार मानले.