फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिरे कुटुंबिय  यांच्यात उफाळून आलेल्या वादाप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांनी रुग्णालयातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांना अटक केली. दोन्ही गटातील संशयितांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी हिरे आणि कार्यालयाची तोडफोड केल्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. न्यायालयात दोन्ही गटाचे समर्थक मोठय़ा संख्येने जमले होते.
मालेगावचे हिरे कुटुंबिय आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वाद नवीन नाही. त्यास यावेळी वेगळे वळण लागले. अद्वय हिरे यांनी फेसबुकवर पक्षाच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी हिरे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढविला. यावेळी मोटारीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी अद्वय हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैभव देवरे, धीरज मगर, मुकेश शेवाळे, अमोल नाईक यांच्याविरुध्द तक्रार दिली. तर वैभव देवरे यांनी अद्वय हिरे यांच्याविरुध्द तक्रार दिली. फेसबुकवर हिरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करून पोलिसांनी राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली. तर अद्वय हिरे प्रकृती अस्वास्थाचे कारण दाखवत रुग्णालयात दाखल झाले. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अद्वय हिरेला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली.
दोन्ही गटातील संशयितांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही गटातील समर्थक न्यायालयाच्या आवारात जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. न्यायालयाने सर्व संशयितांना
२ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.