उरण तालुकाच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या साठच्या दशकातील रानसई धरणात गेल्या पन्नास वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. परिणामी उंची वाढवून व गाळ काढून धरणातील पाण्याची क्षमता वाढविण्याची मागणी पंधरा वर्षांपासून सुरू आहे. याची दखल घेत २००५ मध्ये एमआयडीसीने धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्तावही पारित केला आहे. मात्र धरणाच्या वाढणाऱ्या उंचीमुळे पाण्याखाली येणाऱ्या वन व खासगी जमिनीचा प्रश्न कायम असल्याने गेल्या दहा वर्षांपासून रानसई धरणाच्या उंचीचा व गाळाचा प्रश्न लाल फितीत अडकून पडला आहे. त्यामुळे वाढत्या संख्येच्या उरण शहरापुढे पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरालगत असलेल्या उरणचा औद्योगिक व नागरी विकास झपाटय़ाने होऊ लागला आहे. उरण तालुक्याची लोकसंख्या सध्या दोन लाखांच्या घरात आहे. तसेच परिसरातील उद्योगांनाही पाण्याची आवश्यकता आहे. एम.आय.डी.सी.ने उरणमधील नौदलाच्या शस्त्रागाराला पाणीपुरवठा करण्यासाठी रानसई धरणाची उभारणी केली होती.
दहा दशलक्ष घन मीटर पाणी क्षमता असलेल्या रानसई धरणातूच नागरी व औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र लोकसंख्या व वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली असतानाच धरणाची क्षमताही धरणात गाळ साठल्याने कमी झाली आहे.
त्यामुळे उरणमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील बारवी तसेच सिडकोच्या हेटवणे धरणावर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी एमआयडीसी इतर धरणांतील पाणी या दोन्ही आस्थापनांना देत आपली गरज भागवीत आहे. रानसई धरणाची सध्याची उंची ११७ फूट असली तरी प्रत्यक्षात मात्र पाणीसाठा कमी होत आहे.
पाणी क्षमता वाढविण्यासाठी ४० मीटर पर्यंतची धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी एमआयडीसीने संचालक मंडळात ठराव करून २००५ मध्ये  ३८ कोटी ८५ लाखांची तरतूद केली होती,  मात्र आता त्या खर्चातही वाढ होणार आहे.