प्रचाराची वेळ संपल्यावर शिवसेनेची जाहिरात प्रक्षेपित करणे, काम न करता वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून महिन्याला पैसे उकळणे असे अनेक उद्योग येथील आकाशवाणी केंद्रात सर्रास चालतात. राज्यातील जिल्हा पातळीवरील केंद्रे चालवायला कर्मचारी नाहीत, पण येथे वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेले कर्मचारी भरपूर आहेत.
राज्यात नुकतीच विधानसभेची निवडणूक आटोपली. १५ ऑक्टोबरला मतदान असल्याने १३ तारखेला सायंकाळी पाच वाजता प्रचार संपला. यानंतर कुणालाही प्रचार करता येत नाही. येथील आकाशवाणीत मात्र भलताच प्रकार घडला.
१४ ऑक्टोबरला शिवसेनेची प्रचाराची जाहिरात दोनदा प्रक्षेपित करण्यात आली. विपणन विभाग सांभाळणारे कार्यक्रम अधिकारी प्रदीप जारोंडे यांना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने हा आचारसंहिता भंग आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला, पण या अधिकाऱ्याने जबरदस्तीने या जाहिरातीचे प्रक्षेपण करायला लावले. अखेर या कर्मचाऱ्याने आकाशवाणीच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक थॉमस यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी सी. एल. नंदनपवार यांना चौकशीसाठी येथे पाठवले. प्राथमिक चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने कार्यक्रम अधिकारी जारोंडे यांच्याकडील विपणन विभागाचा कार्यभार काढून टाकण्यात आला. मात्र त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. येथे होणाऱ्या धम्मचक्र सोहळ्याचे प्रक्षेपण केले नाही म्हणून केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या एका अधिकाऱ्याची तातडीने बदली केली होती. हा प्रकार ताजा असतानाच हे आकाशवाणीचे प्रकरण घडले. आता त्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात आकाशवाणीची २० केंद्रे आहेत. त्यापैकी विभागीय पातळीवर असलेली सहा केंद्रे प्रादेशिक आहेत. यांची प्रक्षेपण क्षमता जास्त आहे. उर्वरित १४ केंद्रे जिल्हा पातळीवर कार्यरत आहेत.
ही जिल्हा पातळीवरील केंद्रे मनुष्यबळाअभावी अतिशय रखडत वाटचाल करीत आहेत. आकाशवाणीत कार्यरत असलेल्या बहुसंख्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना या केंद्रात नेमणूक नको असते. सर्वाना प्रादेशिक केंद्रे हवे असतात. यामुळे जिल्हा पातळीवरील केंद्रे ओस पडली आहेत तर प्रादेशिक केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. येथील केंद्रात सुद्धा भरपूर कर्मचारी आहेत. यापैकी अनेकांना कामेच नाहीत. काम नसलेले हे कर्मचारी वरिष्ठांना खूष ठेवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरतात. वेतनातील पैसे लाच  म्हणून देतात. हेच कर्मचारी या केंद्रातील वातावरण खराब करण्यात आघाडीवर असल्याचे एका अधिकारी महिलेने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
एकेकाळी या आकाशवाणीने तयार केलेले कार्यक्रम राज्यभर प्रक्षेपित व्हायचे. गेल्या काही वर्षांत हा प्रकार बंद झाला आहे. नव्या कल्पना नाहीत, संकल्पना नाहीत. तसे कार्यक्रम नाहीत. केवळ राजकारण आणि तेही गलिच्छ स्वरूपाचे, यामुळे या केंद्राचा दर्जा पार लयाला गेला आहे.     (उत्तरार्ध)
मोदींना शिव्या : येथील काही अधिकारी कार्यालयात बसून इतर कर्मचाऱ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करतात. मोदींविषयी प्रत्येकाचे वैयक्तिक मत असू शकते, पण शासकीय कार्यालयात बसून पंतप्रधानांना शिव्या देणे नियमात बसते काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
ताकीद दिली : प्रचाराचा कालावधी संपल्यावर जाहिरातीचे प्रक्षेपण झाले अशी कबुली या केंद्राचे संचालक चंद्रमणी बेसेकर यांनी दिली. मात्र ही जाहिरात प्रचाराची नव्हती तर उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवारांना मतदानाच्या आधी शुभेच्छा दिल्या, त्या संदर्भातील होती असे ते म्हणाले. इतर गैरप्रकारावर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.