जनतेचा न्यायालय व वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, पण संथ न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते समाधानी नाहीत. यासाठी न्यायप्रक्रिया गतिमान होण्यासाठी वकिलांनी योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी रविवारी येथे बोलताना केले. करवीरच्या न्यायिक परंपरेला १७० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्यायमूर्ती शहा यांना निमंत्रित केले होते. या निमित्त शाहू सांस्कृतिक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती शहा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी सत्र न्यायाधीश एस.एस.अहमद होते. कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्त्व जसे उल्लेखनीय आहे तसेच न्यायालयीन परंपराही समृद्ध आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या काळात प्रथम लिखित स्वरूपाचा हिंदू कोड अमलात आणला. याची नोंद देशाच्या घटनेने घेतली आहे. अशा कोल्हापूर नगरीने मला निमंत्रित केले याचा आनंद होत आहे, असा उल्लेख करून न्यायमूर्ती शहा यांनी न्यायप्रक्रियेतील दिरंगाई, प्रलंबित खटल्यांमुळे होणारा त्रास, तणाव याचे विवेचन करून न्यायाबाबतची नाराजी दूर करण्यासाठी न्यायदानात अधिकाधिक वकिलांनी सहभागी होण्याची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले, आजच्या आधुनिक काळात दीर्घकाळ खटले प्रलंबित ठेवणे पक्षकाराच्या हिताचे नाही. शासनालाही याचे महत्त्व पटले असून जलद न्याय देण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता केली जात आहे. सध्या १९०० न्यायाधीश न्यायदानाचे काम करीत असून नवीन १ हजार न्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसेच न्यायालयाच्या ८०० नवीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर न्यायाधीशांसाठी ६०० नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू आहे.
न्यायाधीशांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. बदलीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबी लक्षात घेऊन वकिलांनी न्यायाधीश होण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. न्यायमूर्ती रणजित मोरे म्हणाले, न्यायाची उपलब्धता ही गुणवत्तेशी जोडलेली आहे. गरिबांना न्याय ही केवळ संकल्पना राहू नये, कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी समुपदेशनाचा मार्ग स्वीकारावा. न्यायमूर्ती राजेश केतकर यांनी तज्ज्ञ वकिलांनी न्यायसेवेत सहभागी होऊन पक्षकारांच्या गरजा पूर्ण कराव्यात, असे आवाहन केले. कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव राणे यांनी कोल्हापूर खंडपीठाचा विषय उपस्थित करून त्याचा सकारात्मक विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तत्पूर्वी सहा जिल्ह्य़ांतील बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी न्यायमूर्ती शहा यांचे स्वागत केले. न्यायमूर्ती शहा यांनी भाषणाच्या प्रारंभी काही वाक्ये मराठीत उच्चारून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. अॅड.प्रकाश मोरे यांनी आभार मानले. या वेळी सहा जिल्ह्य़ांतील वकील उपस्थित होते.