कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील वकिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचाही सहभाग होता. अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांच्याशी मोर्चाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. कोल्हापुरात खंडपीठाचा निर्णय त्वरित न झाल्यास न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्कार सुरू राहील, असा इशारा वकिलांनी दिला.
कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू व्हावे या मागणीसाठी गेले तीन दिवस वकिलांचे आंदोलन सुरू आहे. न्यायालयीन कामकाजात असहकार्य ठेवल्याने न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनाला कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील वकिलांनी पाठिंबा दिला आहे.
धरणे आंदोलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते. न्यायालयापासून सुरू झालेला मोर्चा िबदू चौक, दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे, खंडपीठाचे विकेंद्रीकरण झालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात होत्या. तशा आशयाचे फलक वकिलांनी हातात घेतले होते. तर काही वकिलांनी तशा मजकुराच्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे वकिलांनी निदर्शने केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा, डावे पक्ष आदी राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्तेही आले होते. महापौर कादंबरी कवाळे यांनी करवीरच्या जनतेच्या वतीने पाठिंबा व्यक्त केला. बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव राणे, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव प्रकाश मोरे, बार कौन्सिल सदस्य शिवाजी चव्हाण, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अजित मोहिते, अ‍ॅड. धनंजय पठाडे आदींचे शिष्टमंडळ चर्चेसाठी कार्यालयात गेले. अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांना मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर सविस्तर चर्चा केली. या दरम्यान चर्चेसाठी पुढे पुढे घुसण्यातून आणि छायाचित्रात चमकण्यासाठी गर्दी झाल्याने काही काळ आपापसातच गोंधळ निर्माण झाला होता.