वंचित असलेल्या सामान्य नागरिकांना वकिलांनी कमीत कमी शुल्कात न्याय मिळवून दिला पाहिजे, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात ‘जस्टा कॉजा’ विधि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय फणशीकर होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार, विद्यापीठातील विधि अभ्यास मंडळाच्या प्रमुख डॉ. अंजली हस्तक प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेने सामान्य नागरिकांना अनेक अधिकार दिले आहेत. जेव्हा अधिकारांचे उल्लंघन होते, तेव्हा न्यायालयाची पायरी चढून न्याय मागितला जातो. विधिच्या विद्यार्थ्यांना पुढे खूप संधी आहेत. जस्टा कॉजासारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना एक अनुभव मिळतो. त्यामुळे असे कार्यक्रम होणे आवश्यक असल्याचे मत न्या. गवई यांनी यावेळी व्यक्त केले. आज कोटय़वधी रुपये प्राप्त होऊनही समाधान मिळत नाही. पैशासाठी न्याय नाही, तर न्यायासाठी न्याय आहे. वकिली म्हणजे, पैसा मिळविण्यासाठी प्राप्त झालेली पदवी नव्हे. या पदवीचा लाभ सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा, असेही ते म्हणाले.
सामान्य नागरिक पैशामुळे न्यायापासून वंचित राहात आहेत तर पैशाच्या बळावर न्याय विकत घेतला जात असल्याचे दृष्य आज समाजात दिसून येत असल्याचे मत विजय फणशीकर यांनी व्यक्त केले. अनेक गुन्ह्य़ांविषयी तर परस्परविरोधी निर्णय दिले जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये न्यायालयांविषयी चिड निर्माण होत आहे. जो न्याय अभिनेता संजय दत्तला मिळतो, तोच न्याय सामान्य आरोपीला का मिळू शकत नाही, याकडेही फणशीकर यांनी लक्ष वेधून वकीलच कायदेशीर भ्रष्टाचार करीत असल्याचे सांगितले. सामान्य माणसांच्या मनात न्यायालयाविषयी आदर निर्माण होईल, यासाठी वकिलांनीच पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांनी स्वागतपर भाषणातून विधि उत्सवाची माहिती देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या उत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धेत देशभरातील २८ विधि महाविद्यालये सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. अंजली हस्तक यांनीही त्यांचे विचार मांडले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्कृती देवधर व गौरी पुरोहित या विद्यार्थिनींनी संचालन केले. कार्यक्रमास विधि क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.