25 September 2020

News Flash

सात वर्षांनंतर जूनमध्ये नांदेडात पाऊस बरसला

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या सात वर्षांनंतर जून महिन्यात प्रथमच पावसाने हजेरी लावली.

| June 15, 2013 01:30 am

जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागात गेल्या २४ तासांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार असल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या सात वर्षांनंतर जून महिन्यात प्रथमच पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्य़ात साधारण जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवडय़ात पेरणीयोग्य पावसाला सुरुवात होते. गेल्या सात वर्षांपासून जूनमध्ये कधीच पाऊस झाला नव्हता. यंदा त्याला छेद देत गुरुवारपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारीही कायम होता. त्यामुळे सूर्यदर्शनही घडले नाही. पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामास प्रारंभ केला आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांनी गेल्या आठवडय़ात पेरणी केली. या पिकांनाही या पावासाचा चांगलाच फायदा झाला.
पावसाची संततधार असूनही जुना मोढा, नवीन मोंढा भागात बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. गेल्या २४ तासांत सोळा तालुक्यांत पडलेला पाऊस मिलिमीटर – नांदेड १७.७५, मुदखेड २१.३३, अर्धापूर २२.३३, भोकर २५.७५, उमरी १९, कंधार ३.५, लोहा ६.५०, किनवट ५६.१४, माहूर ३७.५०, हदगाव २४, हिमायतनगर ३९.३३, देगलूर ५.३०, बिलोली १७.८०, धर्माबाद ५, नायगाव १२.८०, मुखेड ३.१४. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत केवळ २.८८ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत १९.८२ पावसाची नोंद झाली.
मनपाच्या कामांचे पितळ उघडे
दरम्यान, पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने महापालिकेने केलेल्या कामांचा दर्जा किती सुमार होता, याचे पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच पावसात अनेक वसाहतीतील रस्ते उखडले गेले आहेत. नव्याने समावेश झालेल्या दोन्ही तरोडय़ातील वसाहतीत नाल्यांची कामे अर्धवट असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
बियाणे-खताच्या किमती घसरल्या
बी-बियाणे व खते चढय़ा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट करणारे व्यापारी यंदा मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्य़ात कापसाचे हेक्टरी क्षेत्र घटल्याने बियाणे व खतांची मागणी कमी झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांकडील साठा तसाच राहिला. व्यापाऱ्यांना मागील तुलनेत कमी दराने बियाणे व खते विक्री करावी लागत आहेत. शिवाय केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदान धोरणाअंतर्गत खत प्रकारनिहाय किमती कमी करण्यास खतउत्पादक, पुरवठादार यांना बंधन घालण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे खतांच्या खत प्रकारनिहाय किमती २ ते १५ टक्क्य़ांपर्यंत कमी झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:30 am

Web Title: after 7 years in june rain come down in nanded
Next Stories
1 ‘बीडला पीककर्जासाठी दोनशे कोटी रुपये द्यावे’
2 गोलवाडी-नगरनाका रस्ता चौपदरीकरण
3 गुटखाबंदीची ऐशीतैशी; शौकिनांना घरपोच सेवा!
Just Now!
X