सोनसाखळी चोरीच्या घटना मुंबईत वाढत असताना आता चोरांनी एकटय़ा जाणाऱ्या महिलांच्या मोबाईलला लक्ष केले आहे. मोटारसायकलीवरून भरधाव वेगाने येऊन रसत्याने चालणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याची ही नवीन पद्धत मुंबईत सुरू झाली आहे. चोरांकडून मोबाईल हिसकावण्याचा हा प्रकार मोबाईल धारकासाठी जीवघेणारा ठरू शकतो. पवईतील एक तरुणी अशाच एका जीवघेण्या प्रकारातून बचावली. तिने चोरांना रोखण्यासाठी तिने दोन हात करायचा प्रयत्न केला पण त्यात तीच जायबंदी झाली.
 एका खाजगी कंपनीत काम करणारी ईशा सिंग (२४) पवईत राहते. विक्रोळी स्थानकात उतरून ती रिक्षाने घरी जात असते. २६ ऑक्टोबरला ती संध्याकाळी सातच्या सुमारास उतरली. घरी जाण्यासाठी तिने रिक्षा शोधायला सुरवात केली. पण रिक्षा मिळत नसल्याने ती पुढे चालत गेली. मोबाईल फोन तिच्या हातात होता. कैलाश कॉम्प्लेक्स जवळच्या रस्त्यावरून ती जात असताना पाठिमागून आलेल्या एका तरुणाने तिच्या ईशाच्या मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि तिला जोरदार धक्का दिला. त्यामुळे ईशा खाली पडली आणि तिच्या डोक्यला लागलं. मात्र त्याही परिस्थितीत ती उभी राहिली आणि पुन्हा त्या तरुणाकडून आपला मोबाईल परत मिळवण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्यात आणि त्या तरुणात झटापट झाली पण त्याच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही. तो तरुण त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलीवर बसून पळून गेला. या मारहाणीत ईशा गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्यातून रक्त येत होते.विशेष म्हणजे २ ते ३ मिनिटे हा प्रकार सुरू होता पण कुणी ईशाच्या मदतीला आले नाही. ईशावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या डोक्याला ५ टाके पडले, मानेला आणि हाताला दुखापत झाली. आठ दिवसांच्या उपचारानंतर ती घरी परतली. पार्कसाईट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला क्षणात सुचले नाही त्यामुळे मी जखमी अवस्थेतही उठून मोबाईल घेण्यासाठी गेले. त्यांनी माझी बॅगही हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही, असे ईशा म्हणाली. ईशाने धाडस दाखवून चोरांना ोखण्याचा प्रयत्न केला पण चोरांनी शस्त्राने प्रतिहल्ला केला असता तर तिच्या जीवावर बेतले असते. या परिसरात अशा अनेक घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगिले.

 नवीन लक्ष्य मोबाईल फोन..
भरगर्दीत महिलांच्या गळ्याली सोनसाखळी चोरल्या जातात. मुंबईत दररोज सरासरी चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात पण आता चोरांनी मोबाईलला लक्ष्य केले आहे. रस्त्याने चालत जाणाऱ्य महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पसार होणे ही त्यांची नवीन गुन्ह्याची पद्धत. महागडय़ा स्मार्ट फोनचे आयएमईआय क्रमांक बदलले जाऊन ते पुन्हा वापरात आणले जातात.  अशा पद्धतीने मोबाईल चोरणे सोपे असल्याने चोरांनी ही पद्धत अंगिकारल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रेनमधून, गर्दीच्या ठिकाणी मोबाईल मारणे तुलनेने कठीण असल्याने या पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला आहे.

काय काळजी घ्याल..?
मुंबईत दररोज मोबाईल फोन चोरल्या जाण्याच्या पंधरा ते वीस घटना घडत असतात. अगदी लिलया पद्धतीने मोबाईल चोरणाऱ्या वाकबगार चोरांच्या टोळ्या सक्रीय झालेल्या आहेत. त्यासाठी आपली काळजी आपणच्या घ्यायच्या सुचना पोलिसांनी दिल्या आहेत. मोबाईल मधील डेटाचा (फोन, इतर माहिती ) वेळच्या वेळी बॅकअप घेणे आवश्यक आहे. खाजगी छायाचित्रे मोबाईल फोन मध्ये ठेवण्यात येऊ नये असा सुचना पोलिसांनी दिल्या आहेत. मेमरी कार्ड मधला डिलिट केलेला डेटाही सॉफ्टवेअरच्या आधारे पुन्हा परत मिळवला जातो, त्यामुळे विशेष खबरदारी घ्या, असा सल्ला सायबर तज्ञांनी दिला आहे.