महाबळेश्वर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजाच्या सात तरूणांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रथम एका समाजाच्या तरूणाने मेटगुताड येथील एका तरूणास गजाचे वार करून जखमी केले होते, त्याबाबत विचारणा करण्यासाठी मेटगुताड येथील तरूणांचा गट आला असता वादावादी झाली. महाबळेश्वर टॅक्सी स्टॅंड येथील वाहनतळावर गाडी का आणली या कारणावरून एका समाजाच्या तरूणाने दुसऱ्याशी वाद घातला. तो सामंजस्याने मिटल्यानंतरही ही बातमी समजताच संबंधित गावचे तरूण तेथे आले, जमावाने हातगाडय़ांचे नुकसान केले. दोन्ही समाजातील तरूण आमनेसामने आले असताना पोलिसांनी तरूणांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला.
दरम्यान, पोलिस अधीक्षक अमोल तांबे घटनास्थळी हजर झाले. संबंधित व प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली. पोलिसांनी त्याना योग्य सूचना केल्या. घटनेत सहभागी नसलेल्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील वातावरण शांत करण्यासाठी वाईचे उपविभागीय अधिकारी भास्कर धस, राजेंद्र बोकडे, महाबळेश्वरचे पोलिस अधिकारी एन.बी.कोईनकर यांनी प्रयत्न केले. नंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ सुरू केल्याने तणाव आणखी निवळला.