ठाणे स्थानकात गेल्या दोन दिवसांपासून लग्नसराई असल्याप्रमाणे  लगबग सुरू असून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या शुक्रवारच्या नियोजित दौऱ्यामुळे प्रवाशांचे नशीब अक्षरश: फळफळल्यासारखे चित्र दिसू लागले आहे. स्थानकाचे व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून या परिसराच्या सुशोभीकरणाचा अक्षरश: धडाका लावला आहे. फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून फलाटांची स्वच्छता, इमारतीमध्ये नव्या सुधारणा, डागडुजी, रंगरंगोटीची कामे जोमाने सुरू आहेत. विशेष म्हणजे, स्थानक परिसरातील वाहनतळात शिस्तीने वाहने उभी केली जात असून सगळीकडे टापटीप दिसू लागली आहे. अत्यंत गचाळ आणि अव्यवस्थेने भरलेले हे स्थानक अचानक हवेहवेसे वाटू लागल्याने प्रवासी संघटना शुक्रवारी रेल्वेमंत्र्यांना पुन्हा पुन्हा या असे उपरोधिक साकडे घालणार आहे.
ठाणे स्थानकाचा परिसर फेरीवाले आणि दुचाकी पार्किंगच्या अस्ताव्यस्त विळख्यात सापडला असून यामुळे प्रवासी अक्षरश: हैराण आहेत. रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोकळ्या जागांमध्ये पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आली असून ठेकेदारांच्या माध्यमातून या भागातील पार्किंग व्यवस्था चालते. मात्र पार्किंग करताना संपूर्ण जागा अडवून परिसरातून प्रवाशांना ये-जा करण्याची जागाच उपलब्ध करू दिली जात नाही. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेली भली मोठी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली गेली असून या भागात इतर दिवशी प्रवाशांना प्रवेश बंद असतो. त्यामुळे या भागातून प्रवाशी बाहेर पडू शकत नाही, अशी प्रवाशांची कोंडी केली जाते. सॅटीसच्या खालच्या बाजूस पार्किंग करून जाण्यायेण्याचा मार्ग बंद करून टाकला जातो. स्थानक परिसरामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या भागातून प्रवाशांना बाहेर पडणेही अशक्य असते. मनमानी पार्किंग करण्यामागे ठेकेदाराचा बेशिस्तपणा कारणीभूत असून क्षमतेपेक्षा कैकपटीने या भागामध्ये गाडय़ा उभ्या केल्या जातात.  फेरीवाल्यांच्या बाबतीतही ही परिस्थिती कायम आहे. स्थानकात प्रवेश करण्याच्या आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर पन्नासहून अधिक फेरीवाले बस्तान बसवून असतात. त्यांना हटवण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे अधिकारीही लक्ष देत नाहीत. त्यामुळे या फेरीवाल्यांचा त्रास प्रवाशांना सतत सहन करावा लागतो. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानकात येणार असतील अशा वेळी मात्र फेरीवाले या भागातून गायब झालेले असतात. त्यामुळे या फेरीवाले आणि सुरक्षा यंत्रणेच्या साटेलोटय़ामुळे प्रवाशांना कायमचा त्रास सहन करावा लागतो आहे.
दिव्यामध्ये प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि प्रवाशांनी रुद्ररूप धारण केले होते. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाण्यात रेल्वेमंत्री येणार या एका घोषणेनंतर रेल्वे प्रशासनाने स्थानकाचा कायापालट केला असून स्वच्छता आणि उत्सवी वातावरण प्रवाशांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. स्थानकामध्ये आणखी कोणत्या सुधारणा होत आहेत. याकडे प्रवाशांचे लक्ष जात असून ही परिस्थिती कायम राहावी अशी विनंती प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी सुरेश प्रभू ठाण्यात येणार असून सायंकाळी प्रवाशांसोबत चर्चा करणार आहेत. या वेळी प्रवासी संघटनांच्या वतीने मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बदललेली परिस्थिती प्रभू यांना सांगण्यात येणार असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

अकरा वर्षांनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री ठाण्यात..
भारतातील पहिली रेल्वे सेवा मुंबई ते ठाणे मार्गावर सुरू झाली होती. मात्र या स्थानकाकडे त्यानंतर जास्त लक्ष नसल्याने येथील समस्यांची जंत्री वाढत गेली. २००३ साली भारतीय रेल्वेला दीडशे वर्षे पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार आणि रेल्वे राज्यमंत्री राम नाईक ठाण्यात आले होते. त्यानंतर २००८ मध्ये ठाणे-पनवेल, ठाणे-नेरळ रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी त्या वेळचे रेल्वे राज्यमंत्री ठाणे स्थानकात आले होते आणि त्यानंतर अकरा वर्षांनंतर सुरेश प्रभू ठाण्यातील प्रवाशांशी संवाद साधणार आहेत.