* एसएमएसवर मिळत होती व्यवस्थापन शाखेची प्रश्नपत्रिका
पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेचा फायनान्स मॅनेजमेंट स्पेशलायझेशनच्या ‘डायरेक्ट टॅक्सेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा मंगळवारी विद्यार्थ्यांमध्ये होती. पेपरच्या आदल्या दिवशी रात्री अकरानंतर एसएमएसने प्रश्नपत्रिका मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत चौकशी सुरू असल्याचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.
पुणे विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेची सत्र परीक्षा सध्या सुरू आहे. फायनान्स मॅनेजमेंट स्पेशलायझेशनमध्ये ‘डायरेक्ट टॅक्सेशन’ या विषयाचा पेपर मंगळवारी दुपारी अडीच वाजता होता. सोमवारी रात्री ‘डायरेक्ट टॅक्सेशन’ या विषयाच्या संपूर्ण अभ्यासक्रमामधील कोणत्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याबाबतचा एसएमएस सोमवारी रात्री विद्यार्थ्यांना मिळाला. या प्रकाराबाबत प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेमध्ये सत्तर पैकी चाळीस गुणांचे प्रश्न एसएमएसनुसार आलेल्या मुद्दय़ांवर (टॉपिक्स) विचारण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी माध्यमांशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमातील कोणत्या मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याबाबतचा एसएमएस विद्यार्थ्यांना आदल्या रात्री मिळत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या सर्वच शाखांच्या बाबतीत असे एसएमएस येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याबाबत नाशिक येथील विद्यार्थ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘‘रोज रात्री अकरानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्याबाबतचा एसएमएस येत होता. आतापर्यंत आमची पाच विषयांची परीक्षा झाली, त्या पाचही विषयांचे एसएमएस आले होते. त्यापैकी तीन विषयांबाबत आलेल्या एसएमएसमधील मुद्दय़ांवरच शंभर टक्के पेपर आधारित होता, दर दोन पेपरमध्ये सत्तर टक्के साम्य होते. आम्हाला शब्दश: प्रश्न मिळाले नाहीत, तरी नेमक्या कोणत्या मुद्दय़ावर प्रश्न येणार आहे, ते आदल्या दिवशी रात्री अचूक कळत होते. मला पुण्यातील सिंहगड व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून हे एसएमएस येत आहेत.’’ याबाबत कुलगुरूंनी सांगितले, ‘‘पेपरमधील नेमके प्रश्न विद्यार्थ्यांना आधी मिळत नव्हते, त्याचे मुद्दे मिळत होते. त्यामुळे पेपर फुटले आहेत, असे शंभर टक्के म्हणता येणार नाही. मात्र, या प्रकाराबाबत चौकशी करण्यात येत आहे, तज्ज्ञांचे मत घेतल्यानंतरच या विषयी पुढील निर्णय घेण्यात येईल. सध्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच उरलेली परीक्षा होईल.’’        
आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका वाटल्या
नाशिक येथील एका महाविद्यालयामध्ये शनिवारी अभियांत्रिकी शाखेच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या प्रश्नपत्रिका चुकून आदल्या दिवशी वाटण्यात आल्या होत्या. त्याच दिवशी त्या महाविद्यालयामध्ये एम.एस्सी. फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांची देखील परीक्षा होती. हा प्रकार पर्यवेक्षकाच्या लगेच लक्षात आला, त्यानंतर त्याने या प्रश्नपत्रिका लगेच गोळा केल्या. त्यानंतर नवी प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची मंगळवारी परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे यांनी दिली.