कराड विमानतळ विस्तारवाढीचा प्रश्न विधानसभेत मांडण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने ही गोष्ट लाजिरवाणी असून, या प्रश्नास उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे त्यांचे उत्तर आल्यानंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल अशी भूमिका श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मांडली.
विमानतळ विस्तारवाढविरोधी कृती समितीच्या वतीने विमानतळासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कृषिमित्र आनंदराव जमाले, संजय कदम, गोविंदराव शिंदे, जयसिंग गावडे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची या वेळी उपस्थिती होती.
डॉ. पाटणकर म्हणाले, की मी गेली ४० वष्रे सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. आजपर्यंत अनेकांनी माझ्यावर टीका केली. त्याला मी उत्तर देत नाही आणि देणारही नाही. त्यासंदर्भातील निर्णय विस्तारवाढविरोधी कृती समितीने घ्यावा. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कराडच्या विमानतळ विस्तारवाढीचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या गावातील प्रश्न विधानसभेत उपस्थित होणे ही त्यांच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे. या प्रश्नाला आता मुख्यमंत्र्यांना, शासनाला उत्तर द्यावे लागेल. विधानसभेत प्रश्न उपस्थित झाल्याने त्याच्या चर्चेला तरी सुरुवात आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरली जाईल.
अशोकराव थोरात म्हणाले, की  डॉ. पाटणकर यांनी कोणत्या कामाची सुपारी घेतली? ते कोणत्या कामाच्या आड आले, हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी कृती समितीच्या व्यासपीठावर शेतकरी व बाधित होणाऱ्या नागरिकांसमोर १५ दिवसांत जाहीर करावे अन्यथा त्यांनी डॉ. पाटणकरांची माफी मागावी अशी मागणी  त्यांनी केली.