सोन्याच्या मागणीसाठी ११ वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण करून खून केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. दर्शन रोहित शहा असे या दुर्दैवी बालकाचे नांव आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरले. पोलिसांनी श्वानपथकाद्वारे तपास केला. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास यश आले नव्हते.
सुरक्षानगर परिसरामध्ये आई व आजी यांच्याकडे दर्शन रोहित शहा हा राहत होता. ११ वर्षांचा दर्शन सहावीमध्ये शिकत होता. मंगळवारी सायंकाळी तो खेळण्यासाठी बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे त्याची आई स्मिता यांनी दर्शन बेपत्ता झाल्याची फिर्याद जुना राजवाडा पोलिसात दिली होती. पोलिसांनी रात्रभर दर्शनच्या शोधासाठी मोहीम राबविली होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शहा यांच्या घरासमोर एक बंद पाकीट मिळाले. त्यामध्ये हिंदूी व इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेल्या मजकुराचे पत्र मिळाले. त्यामध्ये असा उल्लेख होता की गतवेळी आई व मुलाने मोठा गोंधळ केला होता. त्यामुळे आम्हाला काही करता आले नाही. आता पुन्हा तसा प्रकार झाला तर दर्शनचे मोजता येणार नाहीत, इतके बारीक तुकडे केले जातील. पोलिसांना या प्रकाराची माहिती न देता एका बांधकाम व्यावसायिकाच्या मशिनरीजवळ सकाळी १० वाजेपर्यंत २५ तोळे सोने आणून द्यावे. दर्शनने घरात सोने कोठे ठेवले जाते याची माहिती आम्हाला दिली आहे. सोने आणून दिले नाही, तसेच पोलीसांकडे गेला त तर दर्शनला ठार केले जाईल, असा इशारा या पत्रामध्ये दिला होता. अंगावर शहारेआणणारे हे पत्र वाचून शहा कुटुंब घाबरून गेले.
या प्रकाराची माहिती स्मिता शहा यांनी पोलिसांना दिली. त्यावर पोलीस यंत्रणा अधिकच सतर्क झाली.पोलीस तसेच परिसरातील नागरिकांनी दर्शनच्या शोधासाठी मोहीम राबविली. शहा यांच्या घरापासून सुमारे१०० मीटर अंतरावर राऊत यांची विहीर आहे. या विहिरीत दर्शनचा मृतदेह सापडला. पट्टीचे पोहणारे व व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान या घटनेची माहिती समजल्यानंतर देवकर पाणंद परिसरात एकच गर्दी झाली होती. रूग्णवाहिकेतून दर्शनचा मृतदेह त्याच्याघरी आणण्यात आला. त्याचा मृतदेह पाहून आई स्मिता व आजी यांनी फोडलेल्या हंबरडय़ामुळे नागरिकांचेही डोळे पाणावले.
दर्शन याचे अपहरण करून खून केला असावा, असा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. घटनास्थळी पोलीसांनी श्वानपथकास पाचारण केले. आरोपींचा मागमूस लागतो का याचा शोध श्वानपथकाव्दारे घेण्यात आला. घटनास्थळी शहर पोलीस उपअधिक्षक महेश सावंत, गुन्हा अन्वेषण पोलीस शाखेचे उपनिरीक्षक सयाजी गवारे यांच्यासह पोलीस मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास याप्रकरणाची फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
 देवकर पाणंद येथील विहिरीतून मृतदेह काढल्यानंतर रूग्णवाहिकेतून तो त्याच्या घरी नेण्यात आला.