कल्याणपल्याडची प्रवासी वाढ बेदखल
गेल्या काही वर्षांत कल्याणपल्याडच्या उपनगरी प्रवाशांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, नेरळ, शेलू, कर्जत, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव या टापूत औद्योगिक आणि नागरी वसाहतींबरोबरच शैक्षणिक संस्थाही मोठय़ा प्रमाणात येत आहेत. त्यामुळे अप तसेच डाऊन दोन्ही मार्गावर प्रवासी वर्दळ वाढली आहे. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पांमध्ये या प्रवासीवाढीची तितकीशी दखल घेतली गेलेली नाही. निदान यंदाच्या अर्थसंकल्पात तरी ही मानसिकता बदलेल, अशी अपेक्षा प्रवासी बाळगून आहेत.   
खास प्रतिनिधी, ठाणे
सध्या महाराष्ट्रात सर्वात वेगाने नागरीकरण होत असलेल्या मध्य रेल्वेवरील कर्जत/कसारा पट्टय़ातील प्रवासी आता चिखलोली आणि गुरवली या दोन नव्या स्थानकांच्या प्रतीक्षेत आहेत. मध्यंतरी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने मुलुंड-भांडुप दरम्यान नाहूर तर दिवा-डोंबिवली स्थानकांमध्ये कोपर स्थानक निर्माण केले. तोच न्याय कल्याणपलीकडच्या प्रवाशांनाही लावावा, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत.
टिटवाळा आणि खडवली या दोन स्थानकांदरम्यान गुरवली गावाजवळ स्थानक करावे, अशी मागणी गेली चार दशके प्रवासी करीत आहेत. या दोन स्थानकांदरम्यान दहा किलोमीटर अंतर असून टिटवाळ्यापासून चार किलोमीटरवर गुरवली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे टिटवाळ्याचे पेशवेकालीन गणेश मंदिर खरे तर या गुरवली गावालगत आहे. याच परिसरात कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील २२ गावे आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे या गावांची लोकसंख्या वाढत असून येथील रहिवाशांना टिटवाळा आणि खडवली दोन्ही स्थानके दूर आहेत. शिवाय या परिसरात कोणतीही पर्यायी परिवहन व्यवस्था नसल्याने स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना बहुतेकदा रिक्षांवर अवलंबून रहावे लागते. रात्री-अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना घर गाठताना अडचणी येतात. त्यामुळे गेली काही वर्षे सातत्याने गुरवली स्थानकाची मागणी प्रवासी करीत आहेत.
गुरवलीप्रमाणेच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन स्थानकांदरम्यान चिखलोली येथे स्थानक उभारण्याची मागणी गेली काही वर्षे प्रवासी करीत आहेत. या दोन स्थानकांदरम्यान आठ किलोमीटर अंतर असून निम्म्यावर चिखलोली हे अंबरनाथ पालिका हद्दीतील गाव आहे. सध्या मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा हा टापू आहे. कारण याच ठिकाणी तुलनेने स्वस्त घरे उपलब्ध आहेत. साधारण दहा वर्षांत या परिसरातील लोकसंख्या दुपटीने वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांची मिळून साडेचार लाख लोकसंख्या आहे. गेल्या दोन वर्षांत या दोन्ही शहरांची त्यातही विशेषत: बदलापूरची झालेली वाढ लक्षात घेता येथील लोकसंख्या आता पाच लाखांपेक्षा अधिक आहे. सध्या ही दोन्ही शहरे एकमेकांच्या दिशेने वाढत असून चिखलोली परिसरात अनेक गृह तसेच औद्योगिक संकुले उभी राहात आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही स्थानके या ठिकाणाहून चार ते साडेचार किलोमिटर अंतरावर आहेत. सध्या कोणतीही परिवहन सेवा उपलब्ध नसल्याने येथील नोकरदार अथवा रहिवाशांना जवळचे स्थानक गाठण्यासाठी एकतर खाजगी वाहन वापरावे लागते अथवा रिक्षाची वाट पहावी लागते.