‘लहानपणी हरवलेला मुलगा आईला मोठेपणी अचानक भेटतो’.. हा हिंदी चित्रपटातील लोकप्रिय फॉम्र्यूला ठाण्यात प्रत्यक्ष घडला असून एका मायलेकांची तब्बल २३ वर्षांनंतर भेट झाली आहे. विशेष म्हणजे, लहानपणी हातावर गोंदलेल्या निशाणीमुळे आईने मुलाला ओखळले आणि  दोघांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.. ठाणे पोलीस दलातील शीघ्रकृती पथकात पोलीस शिपाई गणेश रघुनाथ धांगडे यांची ही कहानी असून पथकातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या शोधामुळेच त्यांना त्यांचे कुटुंबं पुन्हा मिळाले.
सावरकरनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेत गणेश लहानपणी शिक्षण घेत होते. गणेश सात वर्षांचे असताना शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत फिरायला गेले होते. रेल्वे प्रवासादरम्यान त्यांचे मित्रही साथ सोडून निघून गेले आणि ते एकाकी झाले. घरी परतण्याचा मार्गही त्यांना उमलत नव्हता. रेल्वे स्थानक, पदपथ, चौपाटी.. असा प्रवास करत त्यांनी काही दिवस काढले. एके दिवशी पदपथावर राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांना आसरा दिला. मात्र एका अपघातामुळे या कुटुंबापासून ते दुरावले. सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या ओळखीने त्यांना वरळीतील एका हॉस्टेलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. खेळात विशेष प्रावीण्य दाखविल्यामुळे शिक्षकांनी पुणे येथील बालेवाडी क्रीडा प्रबोधिनीत त्यांना पुढील तयारीसाठी पाठविले. त्या ठिकाणी निवड झाल्याने त्यांना ठाणे येथील क्रीडा प्रबोधिनीत पाठविण्यात आले. नाखवा हायस्कूलमध्ये आठवी ते बारावी आणि ठाणे कॉलेजमध्ये कला शाखेतून पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
२०१० साली क्रीडा क्षेत्रातील विशेष प्रावीण्याच्या जोरावर गणेश ठाणे पोलीस दलात भरती झाले. दौंड येथे पोलीस प्रशिक्षण घेऊन ठाणे पोलीस मुख्यालयात रुजूही झाले. सध्या ते शीघ्रकृती दलात शिपाई पदावर कार्यरत आहेत. नव्याने दाखल झालेल्या सर्व पोलीस शिपायांच्या कुटुंबाविषयी या पथकातील पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी चौकशी केली. त्या वेळी गणेश यांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती देता आली नाही. लहानपणी हरविल्यामुळे कुटुंबाविषयी काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. हातावर गोंदलेल्या ‘मंदा र धांगडे’ यावरून केवळ आपले नाव माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू झाला. पोलीस निरीक्षक सोंडे आणि पथकातील सहकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे ठरविले. त्या वेळी वरळी येथील हॉस्टेलमध्ये असलेल्या शमसुद्दीन अब्दुल शेख (अण्णा) यांच्याकडे याविषयी विचारपूस केली असता मामा-भांजे परिसरात राहत असल्याची माहिती गणेशने त्या वेळी दिली होती, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार, वागळे इस्टेट परिसरातील मामा-भांजे परिसरातील वस्त्यांमध्ये गणेशच्या कुटुंबीयांचा शोध सुरू झाला आणि त्यातूनच लोकमान्यनगर परिसरात गणेशचे कुटुंब सापडले.