24 November 2017

News Flash

बार बार हुक्का बार..

‘खिलाडी ७८६’ या चित्रपटातले ‘तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार’ हे गाणे सध्या तरुणाई

सुहास बिऱ्हाडे, मुंबई | Updated: February 2, 2013 3:24 AM

‘खिलाडी ७८६’ या चित्रपटातले ‘तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार’ हे गाणे सध्या तरुणाई गुणगुणत असली तर मुंबई पोलिसांनीही ‘बार बार बार हुक्का बार’ हा राग आवळत पब आणि हुक्काबार वर धडक कारवाई सुरू केली आहे. २०११ च्या तुलनेत पोलिसांच्या समाजसेवा शाखेने २०१२ या वर्षांत मुंबईच्या विविध पब्ज, बार आणि हुक्का बारवर चौपट कारवाई केली आहे. त्यामुळे डिजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईचा पुरता बेरंग झालेला आहे. २०११ मध्ये समाजसेवा शाखेने ९ पब्जवर छापे मारून कारवाई करुन १७ जणांना अटक केली होती. तर २०१२ मध्ये तब्बल ४१ पबवर कारवाई करून ६७ जणांवर कारवाई करण्यात आली. तर २०११ मध्ये १८ हुक्का पार्लरवर छापे घालून ३९ जणांवर कारवाई करण्यात आली होती तर २०१२ मध्ये तब्बल ८५ हुक्का पार्लरवर छापे घालून ४३१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बोलताना समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी सांगितले की, हल्ली श्रीमंत घरातील तरूण वर्ग मोठय़ा प्रमाणात पब आणि हुक्का बारमध्ये जातो. तेथे नियमांचे उल्लघंन होत असते शिवाय अनेक अनैतिक प्रकार घडत असतात. त्यामुळे ही कारवाई करावी लागते. मद्याचा कैफ चढला असताना पोलिसांची कारवाई झाल्याने साहजिकच तरुणांचा बेरंग होतो आणि पोलिसांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण त्याला पोलिसांचा नाईलाज असतो. २०१२ या वर्षांत पोलिसांनी ७४ बारवरही कारवाई केली. त्यात ६७४ लोकांना अटक करून सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बारच्या आडून बऱ्याच ठिकाणी छुपा वेश्याव्यवसायसुद्धा चालत असतो. तो उधळून लावत समाजसेवा शाखेने पिटा कायद्याअंतर्गत (प्रिव्हेंशन ऑफ इम्मॉरल ट्रफिकिंग अ‍ॅक्ट) नुसार कारवाई करत ३२६ तरुणींची सुटका केली होती. २०११ मध्ये याप्रकरणी ६५ गुन्हे दाखल करुन २९१ तरुणींची सुटका करण्यात आल्याची माहिती फिरोज पटेल यांनी दिली.
मी काय गुन्हा केला
कारवाई दरम्यान पोलिसांना अनेक गमतीशीर अनुभव येतात. पोलिसांनी नुकतीच एका बारवर कारवाई केली. कारवाई सुरू असताना तिथे गिऱ्हाईक म्हणून आलेल्या सर्वावर कारवाई करण्यात आली.  त्यापैकी एका मध्यमवयीन गृहस्थाने पोलिसांना येऊन शांतपणे विचारले, माझा गुन्हा काय.. मी उच्चकुलीन आणि सुशिक्षित आहे. गेले १५ दिवसांपासून माझे पत्नीशी भांडण झाले आहे. मी इथे विरंगुळ्यासाठी आलो. ते माझे पैसे मी उडवले तर काय बिघडले. मी प्राप्तिकर भरतो मग माझा गुन्हा काय? या सवालाने पोलीसही अवाक झाले.

गुप्त दरवाजांचे मायाजाल
अनेक मोठय़ा बारमध्ये छुपा वेश्याव्यवसाय चालतो. पोलीस गेल्यावर अवघ्या ३० सेकंदांत तेथील मुली गायब होतात. या बारमध्ये भिंतींमधून गुप्त दरवाजा काढलेला असतो. तेथून या मुलींना लपविण्यात येते. हे दरवाजे इतक्या खुबीने तयार केलेले असतात की कुणालाच या भिंतीतून गुप्त दरवाजा असेल याची कल्पना येत नाही, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज पटेल यांनी दिली.

पब आणि हुक्का बारवरील वाढलेल्या कारवाईचा तक्ता
पब                                   
२०११                              २०१२
एकूण छापे – ०९                  एकूण छापे- ४१
अटक -१७                         अटक- ६७

हुक्का बार
२०११                                   २०१२
एकूण छापे- १८                   एकूण छापे- ८५
अटक- ३९                         अटक- ४३१

First Published on February 2, 2013 3:24 am

Web Title: again and again hukka bar