सहा महिन्यांपूर्वीच मुदत संपलेल्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाला (भिंगार छावणी मंडळ) दुस-यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दि. ५ जूनपर्यंत मुदतवाढीचा आदेश बुधवारी सांयकाळी येथे प्राप्त झाला असून, आता त्यानंतर नवी निवडणूक होईल. आता लोकसभेच्या निवडणुकीनंतरच ही निवडणूक होईल.
कॅन्टोन्मेंट बोर्डाची मुदत गेल्या मे १३ मध्येच संपली. मात्र त्या वेळी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्या मुदतवाढीमुळे बोर्डाची निवडणूक लांबणीवर पडला. पहिल्या मुदतवाढीची मुदत गेल्या वर्षअखेरीला मंगळवारीच संपली, मात्र त्यानंतर चोवीस तासांतच पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाचा हा आदेश बुधवारी सायंकाळीच येथे प्राप्त झाला. दुस-यांदा मिळालेल्या मुदतवाढीमुळे सध्याच्या पदाधिका-यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. एकुणात त्यांना तब्बल वर्षभरापेक्षा अधिक काळासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
दरम्यान, पहिल्या मुदतवाढीची मुदत ३१ डिसेंबरला संपत होती, त्यामुळे प्रशासनाने निवडणुकीची प्राथमिक तयारी सुरू केली होती. बोर्डाच्या अंतिम मतदारयाद्याही तयार आहेत. येथे सध्या काँग्रेसची सत्ता असून एकूण सातपैकी त्यांचे ३ व शिवसेनेचे ३ सदस्य आहेत. भारिपच्या एका सदस्याने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शाश्वती नसल्याने राजकीय पातळीवरही निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याही आता पुन्हा लांबणीवर पडतील.